अमरावती: विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपकडून प्रवीण पोटे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेना, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली, पण आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या अनुपस्थितीने महायुतीत ‘आलबेल’ नसल्याची चर्चा रंगली आहे.
महायुतीच्या कोणत्या नेत्यांची हजेरी?
अमरावतीतून भाजपचे उमेदवार म्हणून प्रवीण पोटे यांच्या नावावर काल रात्री शिक्कामोर्तब झाले. ते गेल्या २९ मे रोजीच उमेदवारी अर्ज दाखल करणार होते, तयारीही झाली होती, पण नंतर त्यांनी आजचा मुहूर्त निवडला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू, माजी खासदार आनंदराव अडसूळ, तिवसाचे भाजपचे आमदार राजेश वानखडे, प्रताप अडसड यांच्यासह इतर नेते यावेळी उपस्थित होते.
रवी राणांच्या नाराजीची चर्चा
युवा स्वाभिमान पक्ष हा महायुतीतील एक घटक पक्ष आहे. त्यामुळे राणा यावेळी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा पोटे समर्थकांनी व्यक्त केली होती. पण, काल रात्री अमरावतीत शिवपरिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून ते दिल्ली येथे गेल्याचे सांगितले जात आहे. माजी खासदार नवनीत राणा देखील दिल्ली येथे आहेत. राणा दाम्पत्याच्या अनुपस्थितीमुळे हे दोघेही नाराज असल्याची चर्चा आहे. प्रवीण पोटे यांच्या उमेदवारीला राणा दाम्पत्याने जोरदार विरोध दर्शवल्याचेही बोलले गेले.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
राणा दाम्पत्याच्या नाराजीविषयी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रश्न विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले, मी आज सकाळीच रवी राणा यांच्यासोबत चर्चा केली. दोघेही अमरावतीत नाहीत. मी त्यांना सोबत घेऊनच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोबत घेऊन येणार होतो. परत आल्यानंतर तें माझ्यासोबत चर्चा करणार आहेत. दोघेही प्रगल्भ नेते असून काही स्थानिक मतभेद असले तरी ते महायुतीसोबतच राहतील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.
प्रवीण पोटेंचा विजयाचा दावा
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवणारे प्रवीण पोटे यांनी यावेळी देखील विक्रमी मतांनी विजयाचा दावा केला आहे. ते म्हणाले. या मतदारसंघात माझे कौटुंबिक नाते जुळले आहे. त्यांच्या सुखदु:खात मी सोबत राहतो. महायुतीत कोणताही कलह नाही. भाजपचे एकही मत फुटणार नाही. याशिवाय इतर पक्षातील सदस्यांचीही मते मला मिळतील.
