अमरावती: विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीसाठी केवळ आठवडाभराचा कालावधी शिल्लक असताना काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला आहे. काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या कलहासाठी वरिष्ठ पातळीवरून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना जबाबदार ठरवण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा रंगली आहे. आता या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे.

नेमके काय घडले?

विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीचा मुद्दा सुरूवातीपासूनच वादग्रस्त ठरला आहे. या निवडणुकीत तिसऱ्यांना मैदानात उतरलेले भाजपचे प्रवीण पोटे यांच्या विरोधात काँग्रेसने ऐनवेळी नागपूर येथील उद्योजक हर्षजीत देशमुख यांना उमेदवारी दिल्यानंतर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले गेले. पण, काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आदेश शिरसावंद्य मानून प्रचाराला सुरूवात केली. ऐन प्रचाराच्या महत्वाच्या टप्प्यात हर्षजीत देशमुख हे नागपूर येथील रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टराच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आल्याचे हर्षजीत देशमुख यांचे म्हणणे आहे.

स्थानिक नेत्यांसोबत संवाद नाही

निवडणूक प्रचारादरम्यान हर्षजीत देशमुख यांनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत संवादच साधला नाही. ते अचानकपणे नागपूरला निघून गेले आणि रुग्णालयात दाखल झाले, हा सर्व घटनाक्रम ते ‘मॅनेज’ झाल्याचे दर्शवतो, असा आरोप माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला. माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनीही याविषयी उघड नाराजी व्यक्त केली. त्यातच यशोमती ठाकूर यांनी यात १५ ते २० कोटींचा व्यवहार झाल्याची चर्चा आहे, असा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली.

हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका काय?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल याविषयी बोलताना यशोमती ठाकूर यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे सांगितले होते. आता ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे काँग्रेसच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. पण, या संपूर्ण प्रकरणात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. हर्षजीत देशमुख यांना उमेदवारी बहाल करण्याचा हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्णय आता त्यांच्यावरच उलटणार की काय, अशी चर्चा रंगली आहे. निवडणुकीतील मतदार असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. मात्र, पक्षातील या कलहाचे खापर स्थानिक नेत्यांवर फोडण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.