अमरावती: विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीत आज मतदानाच्या दिवशी देखील नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. काँग्रेसच्या सदस्यांनी मतदानाला गैरहजर राहून तटस्थ रहावे, असे आदेश पक्षाकडून देण्यात आल्यानंतरही त्याला तिलांजली देत तिवसा येथील १२, अमरावतीचे ११ आणि दर्यापूर येथील एक सदस्य वगळता इतरांनी मतदानात सहभाग घेतल्याचे चित्र दिसले. दरम्यान, भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी तिसऱ्यांदा विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.
काँग्रेसमध्ये अंतर्गत बेबनाव
काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख हे गेल्या ५ जूनपासून रुग्णालयात दाखल असल्याने ते या संपूर्ण प्रक्रियेतून दूरच राहिले. त्यातच काँग्रेसने या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसकडे शहर आणि ग्रामीण मिळून ११९ चे संख्याबळ आहे. ९५ नगरसेवकांनी मतदानात सहभाग घेऊन पक्षादेश धुडकावून लावला. अमरावती महापालिकेत काँग्रेसचे १७ नगरसेवक असून त्यापैकी सहा जणांनी गटनेत्याने बजावलेल्या ‘व्हीप’कडे दुर्लक्ष करीत मतदान केले. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत बेबनाव समोर आला आहे.
एक हजार एक टक्के विजयी होणार
भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे म्हणाले, माझा विजय १००१ टक्के निश्चित असून मो मोठ्या मताधिक्याने होईल. माझ्यासमोर कोणताही तगडा विरोधक नव्हता. माझे जुने मतदार, माझी काम करण्याची पद्धती आणि सर्वपक्षीय मतदारांशी असलेले माझे सलोख्याचे संबंध या बळावरच मला हा विश्वास आहे. काँग्रेसने घेतलेल्या तटस्थतेच्या भूमिकेविषयी विचारले असता पोटे म्हणाले, आपल्या मतदारांना तटस्थ राहण्याचा पक्षादेश जारी करणे, हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु, माझे सर्वच पक्षांमध्ये मित्र आहेत आणि त्यांपी मलाच मतदान केले असेल, याची मला खात्री आहे.
सरासरी ९४.६८ टक्के मतदान
जिल्ह्यातील एकूण सात मतदान केंद्रांवर सरासरी ९४.६८ टक्के मतदानाची नोंद झाली असून रिंगणातील तीन उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले आहे. येत्या २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघात एकूण ४५१ पात्र मतदार होते. यामध्ये २२५ पुरूष आणि २२६ महिला मतदारांचा समावेश आहे. यापैकी ४२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. धारणी, अचलपूर, चांदूर रेल्वे आणि मोर्शी या केंद्रांवर १०० टक्के मतदान झाले. तर दर्यापूर येथ ६० पैकी ६९, अमरावतीत ९५ पैकी ८४, तिवसा-भातकुली केंद्रावर सर्वात कमी म्हणजे ३८ पैकी २६ जणांनी मतदान केले.
