नागपूर : पूर्व भारतातील ब्रह्मपूर आणि पश्चिम भारतातील उधना यांना जोडणारी १९०२१/१९०२२ अमृत भारत एक्स्प्रेस आता नियमित त्रि-साप्ताहिक धावणार असून नागपूर, बडनेरा, भुसावळसह विदर्भातील प्रवाशांना जलद, थेट आणि आधुनिक रेल्वे प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.
ब्रह्मपूर–उधना दरम्यान नवा रेल्वे दुवा
पूर्व आणि पश्चिम भारतातील रेल्वे संपर्क अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ब्रह्मपूर–उधना अमृत भारत एक्स्प्रेस आता नियमित त्रि-साप्ताहिक सेवेत धावणार आहे. उद्घाटन विशेष फेरीनंतर गाडी क्रमांक १९०२१ उधना–ब्रह्मपूर आणि १९०२२ ब्रह्मपूर–उधना या क्रमांकाने सेवा सुरू राहणार आहे. ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि गुजरात या चार राज्यांना जोडणारी ही गाडी प्रवाशांसाठी महत्त्वाची सुविधा ठरणार असून विशेषतः विदर्भातील प्रवाशांना थेट रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे.
नागपूरसह प्रमुख स्थानकांवर थांबा
१९०२१ अमृत भारत एक्स्प्रेस उधना येथून सकाळी ७.१० वाजता सुटून भुसावळ येथे दुपारी १२.३५, बडनेरा येथे सायंकाळी ४.२० आणि नागपूर येथे सायंकाळी ७.२० वाजता पोहोचते. त्यानंतर गाडी वर्धा, गोंदिया, दुर्ग, रायपूर, रायगडा, विजयानगरम, श्रीकाकुलम रोड, पलासा मार्गे ब्रह्मपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.५५ वाजता पोहोचते. त्यामुळे विदर्भातून पूर्व भारतात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.
आधुनिक सुविधांनी सज्ज २२ डब्यांची रचना
अमृत भारत एक्स्प्रेस ही सर्वसामान्य प्रवाशांसाठी आधुनिक आणि आरामदायी प्रवासाची संकल्पना लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहे. गाडीत एकूण २२ डबे असून सुधारित आसनव्यवस्था, आकर्षक एलईडी प्रकाशयोजना, मोबाईल चार्जिंग सुविधा, प्रवासी माहिती प्रणाली, अधिक सुरक्षित अंतर्गत रचना आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात अधिक आरामदायी अनुभव मिळावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा
नागपूर, बडनेरा आणि भुसावळ या महत्त्वाच्या स्थानकांवरील थांब्यांमुळे विदर्भातील व्यापारी, विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे तसेच पर्यटन आणि धार्मिक स्थळांना जाणाऱ्या प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे. यापूर्वी अनेक प्रवाशांना बदल करून प्रवास करावा लागत होता. मात्र, या गाडीमुळे थेट रेल्वे सेवा उपलब्ध झाल्याने वेळेची बचत होणार असून पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम भारतातील औद्योगिक, व्यावसायिक तसेच सामाजिक देवाणघेवाणीलाही चालना मिळण्याची अपेक्षा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.
