नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असतात. पर्यावरण रक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठीही त्या नेहमी काम करतात. तसेच त्या विविध विषयांवर आपली स्पष्ट भूमिका मांडण्यासाठीही प्रसिद्ध आहेत. कॉक्रोच जनता पक्ष म्हणजे सीजेपीच्या दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर झालेल्या आंदोलनाला भाजप आणि मित्र पक्षांकडून प्रचंड टीका होत असली तरी अमृता फडणवीस यांनी या आंदोलनासंदर्भात आपली वेगळी भूमिका मांडली आहे. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

भाजपचे पदाधिकाऱ्यांनी काय भूमिका मांडली होती

कॉक्रोच जनता पक्षाच्या दिल्ली येथील आंदोलनावर भाजपच्या अनेक नेत्यांकडून टीका करण्यात आली. हे आंदोलन देशद्रोही आहे, याला विदेशी निधीचा पाठिंबा आहे, असेही आरोप करण्यात आले. या आंदोलनाला जातीय आणि धार्मिक रंगही देण्यात आला. सरकारला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही झाला. याशिवाय सीजेपी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना अनेकदा धमक्याही देण्यात आल्या. आंदोलनामध्ये झालेल्या विविध प्रकारांवरही भाजपकडून कडाडून टीका करण्यात आली. मात्र, आंदोलक आपल्या भूमिकेवर शेवटपर्यंत कायम राहिले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.

अमृता फडणवीसांनी कसले समर्थन केले ?

नागपूरमधील एका कार्यक्रमाला आल्या असता अमृता फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, सीजेपीचे दिल्ली येथील आंदोलन हे नीट परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळावरून सुरू झाले होते. त्याला देशभरातील विद्यार्थ्यांचा पाठिंबा हाेता. सुरूवातीला आंदोलन योग्य दिशेने सुरू होते. त्याला कुणाचाही विरोध नव्हता. मात्र, काही दिवसांनी आंदोलनामध्ये असामाजिक तत्वाच्या संघटनांनी सहभाग घेतला. त्यानंतर आंदोलनाची दिशा बदलली. देशविरोधी आणि आझादीच्या घोषणाही आंदोलनात देण्यात आल्या. आंदोलन भरकटल्याने त्यावर टीका करण्यात आली. तसेच नीट परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळावर केंद्र सरकार कठोर कारवाई करत आहेत. अनेकांना शिक्षा झाली आहे. तसेच आताही त्यावर काम सुरू असून कारवाई होत आहे. त्यामुळे याला राजकीय मुद्दा करणे योग्य नाही, असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.

आंदोलनावर काय टीका झाली

कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखाली दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर भाजप खासदार कंगना रणौत यांनी आंदोलनातील भाषा आणि सोशल मीडिया रील्सवर तीव्र आक्षेप घेत त्यांना जेनरेशन गटर व गटर छाप अशी टीका केली. तसेच सरकारवर दबाव टाकण्याच्या पद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. आंदोलक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या रील्स आणि वापरलेली भाषा अत्यंत आक्षेपार्ह व क्लेशदायक असल्याचे म्हटले. आंदोलनातील दृश्ये आणि पोस्टर्समध्ये सुसंस्कृतपणाचा अभाव असून त्यामुळे अस्वच्छता पसरत असल्याचा आरोप केला. सरकार चालवण्याचा अधिकार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींना असतो, असे सांगत आंदोलकांना थेट निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले.