नागपूर: बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्याच नाही तर आता पर्यटकांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. मंगळवारी पुन्हा एकदा बाहेरच्या बिबट्याने प्राणीसंग्रहालयातील सफारी कक्षात प्रवेश केला. या बिबट्याला पकडण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी परवानगी दिली. मात्र, त्याला जेरबंद करेपर्यंत सफारी बंद ठेवण्याबाबत अजूनही गोरेवाडा प्रशासन संभ्रमात आहे. त्यामुळे येथील इतर प्राण्यांच्या सुरक्षेसोबतच पर्यटकांच्या सुरक्षेचाही मुद्दा चर्चेला आला आहे.
गोरेवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्या आहेत आणि आतापर्यंत अनेकदा बाहेरच्या बिबट्यांनी या प्राणीसंग्रहालयात प्रवेश केला आहे. यात एका मादी बिबट्याचा बळी देखील गेला आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान बिबट्याने गोरेवाड्याच्या सुरक्षा भिंतीवर चढण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला नाही, पण सायंकाळी मात्र तो आत शिरल्याचे अनेकांनी पाहीले. त्यामुळे गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाच्या एकूणच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही माहिती मिळताच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी धावपळ सुरू केली. त्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे बिबट्याला पकडण्याची परवानगी मागितली.
हेही वाचा… नागपूर: लक्ष्मीच्या मूर्तीसह पूजेसाठी ठेवलेले दहा लाखांचे दागिने चोरी
ती परवानगी मिळाल्यानंतर आता त्याला पिंजरा लावून जेरबंद करायचे की ट्रँक्विलायजिंग बंदूकीने बेशुद्ध करायचे, याचा निर्णय झालेला नाही. बाहेरच्या बिबट्याचे आत येणे धोकादायक असतानाही पर्यटन बंद ठेवण्याचा कोणताही निर्णय प्रशासनाने घेतला नाही. त्यामुळे पर्यटकांचा जीव मोठा की पर्यटनातून मिळणारा महसूल महत्त्वाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सफारी बंद ठेवणार नाही
प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी बिबट्याला जेरबंद करण्याची परवानगी दिली आहे. पिंजरा लावायचा की बेशुद्ध करुन पकडायचे, याचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. ॲडव्हान्स बुकिंग असल्यामुळे सफारी बंद ठेवता येणार नाही. एकूण परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.