चंद्रपूर : आनंदवनच्या शैक्षणिक वारशाशी गेल्या सहा दशकांपासून जोडलेल्या आनंदनिकेतन महाविद्यालयाच्या प्रस्तावित व्यवस्थापन हस्तांतरणाबाबत महारोगी सेवा समितीने मोठा निर्णय घेत पुढील वैधानिक प्रक्रियेसाठी चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूर यांची प्रस्तावित नवीन व्यवस्थापन संस्था म्हणून निवड केली आहे. महारोगी सेवा समितीने अधिकृत निवेदनात या संस्थेची निवड केल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र यासंदर्भात अंतिम निर्णय प्रलंबित असल्याची माहिती महारोगी सेवा समितीचे विश्वस्त कौस्तुभ आमटे यांनी दिली.

कुष्ठरोगी, अंध आणि दिव्यांगांना नवजीवन देणाऱ्या प्रसिद्ध समाज सेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनच्या भूमीत आनंदनिकेतन महाविद्यालयाने सहा दशकांपासून ज्ञानदानाची परंपरा जपली आहे. मात्र, महाविद्यालयाची सुमारे २५ हजार चौरस फुटांची इमारत जीर्ण झाली असून, तिच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे १०३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एवढी मोठी आर्थिक तरतूद करणे सध्याच्या व्यवस्थापनासमोर आव्हान ठरत आहे. त्यामुळे महाविद्यालयाचे शैक्षणिक सातत्य, विद्यार्थ्यांचे हित आणि आनंदवनचा शैक्षणिक वारसा यांचा विचार करून व्यवस्थापन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी महारोगी सेवा समितीने वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून शैक्षणिक संस्थांकडून स्वारस्य प्रस्ताव महाविद्यालयाच्या व्यवस्थापनासाठी मागविले होते. त्यानुसार महारोगी सेवा समितीकडे चार शिक्षण संस्थांकडून प्रस्ताव प्राप्त झाले. या प्रस्तावांची शैक्षणिक अनुभव, प्रशासकीय व आर्थिक क्षमता, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय चालविण्याचा अनुभव, विद्यार्थी व कर्मचारी हितरक्षण, वैधानिक अनुपालन तसेच समितीच्या अटी स्वीकारण्याची तयारी या विविध निकषांवर पडताळणी करण्यात आली.

प्राप्त चार प्रस्तावांपैकी चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूर, जि. चंद्रपूर यांनी आवश्यक पडताळणी प्रपत्रासह संबंधित माहिती आणि कागदपत्रे सादर केली. उपलब्ध कागदपत्रे व माहितीच्या आधारे समितीने या संस्थेची पुढील वैधानिक प्रक्रियेसाठी प्रस्तावित नवीन व्यवस्थापन संस्था म्हणून निवड केली. चिंतामणी संस्थेने ४ सप्टेंबर रोजी आपला प्रस्ताव सादर केला होता.

अंतिम निर्णयासाठी अनेक मंजुऱ्या आवश्यक

चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळाची निवड झाली असली तरी याचा अर्थ आनंदनिकेतन महाविद्यालयाचे व्यवस्थापन प्रत्यक्ष हस्तांतरित झाले, असा नाही. विद्यापीठाची मान्यता, राज्य शासनाची मंजुरी, धर्मादाय आयुक्त तसेच शालेय शिक्षण विभाग आणि अन्य लागू सक्षम प्राधिकरणांच्या आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष हस्तांतरणाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे अंतिम आदेश होईपर्यंत महाविद्यालयाची विद्यमान कायदेशीर आणि प्रशासकीय स्थिती कायम राहणार आहे अशी माहिती महारोगी सेवा समितीचे विश्वस्त कौस्तुभ आमटे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. धर्मदाय आयुक्त व विद्यापीठाकडे दोन दिवसांपूर्वी प्रस्ताव पाठविला आहे. या संपूर्ण प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळण्यासाठी जून २०२७ पर्यंत वाट बघावी लागणार आहे. या प्रस्ताव शासन, धर्मदाय आयुक्त नाकारू देखील शकतात असेही आमटे यांनी सांगितले. महारोगी सेवा समितीचे कौस्तुभ आमटे यांनी दोन्ही संस्था परस्पर निर्णय घेऊन व्यवस्थापन हस्तांतरित करू शकत नसल्याचे एका निवेदनातून सांगितले. यासंदर्भात चिंतामणी शिक्षण संस्थेचे स्वप्नील दोन्तुलवार यांच्याशी संपर्क केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांची बाजू कळू शकली नाही.

जीर्ण इमारत ठरतेय मुख्य आव्हान

आनंदनिकेतनच्या व्यवस्थापन बदलाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी महाविद्यालयाच्या जीर्ण इमारतीचा प्रश्न आहे. सुमारे २५ हजार चौरस फुटांच्या या वास्तूची पुनर्बांधणी करण्यासाठी मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता आहे. त्यामुळे केवळ व्यवस्थापन कोणाकडे राहणार, एवढाच हा प्रश्न नसून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य, कर्मचारी हित आणि सहा दशकांच्या शैक्षणिक परंपरेचे जतन या बाबीही त्याच्याशी जोडलेल्या आहेत. पोंभुर्णा, घुग्घुस, बल्लारपूर आणि गोंडपिपरी येथे महाविद्यालये चालविणाऱ्या चिंतामणी संस्थेकडे आनंदनिकेतनची जबाबदारी सोपविण्याचा प्रस्ताव सध्या वैधानिक प्रक्रियेत आहे. त्यामुळे पुढील काळात संबंधित प्राधिकरणांकडून मिळणाऱ्या मंजुऱ्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अंतिम मंजुरी बाकी

चार संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले, त्यापैकी एका संस्थेने आवश्यक पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली आणि तिची पुढील वैधानिक प्रक्रियेसाठी निवड झाली. मात्र, अंतिम मंजुरी आणि आदेश अद्याप बाकी आहेत. त्यामुळे आनंदनिकेतन महाविद्यालयाचे व्यवस्थापन हस्तांतरित झाल्याचे म्हणणे सध्याच्या स्थितीत अकाली ठरणार आहे असे महारोगी सेवा समितीने स्पष्ट केले.आहे. महारोगी सेवा समितीने येथे प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात चिंतामणी शिक्षण संस्थेची निवड केली आहे ही बाब मान्य केली आहे.