नागपूर : उद्योग, ऊर्जा आणि पायाभूत सुविधांनंतर आता वन्यजीव व्यवस्थापनाचेही ‘धडे’ उद्योगसमूह देणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. अनंत अंबानी यांनी स्थापन केलेल्या वनतारा या संस्थेतर्फे जामनगर येथे जागतिक दर्जाचे ‘वनतारा विद्यापीठ’ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून वन्यजीव संरक्षण आणि पशुवैद्यकीय विज्ञानासाठी समर्पित असे पहिले एकात्मिक जागतिक विद्यापीठ उभारण्याचा दावा करण्यात आला आहे.

वन्यजीव व्यवस्थापन, उपचार, संशोधनावर भर

रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाच्या या नव्या उपक्रमातून वन्यजीव व्यवस्थापन, उपचार आणि संशोधन क्षेत्रात तज्ज्ञ मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. वन्यजीव वैद्यक, शस्त्रक्रिया, पोषणशास्त्र, वर्तनशास्त्र, जनुकशास्त्र, महामारीशास्त्र आणि ‘वन हेल्थ’सारख्या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल, अशी माहिती देण्यात आली.

या विद्यापीठाच्या उभारणीला पारंपरिक ज्ञानाचा संदर्भ देत प्राचीन नालंदा विद्यापीठ परंपरेची प्रेरणा घेतल्याचेही नमूद करण्यात आले. भूमिपूजन सोहळ्यात देशातील विविध परिसंस्थांमधून आणलेल्या माती, पाणी आणि दगडांच्या माध्यमातून जैवविविधतेचे प्रतीकात्मक दर्शन घडवण्यात आले.

विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रमाची योजना

वनतारा विद्यापीठात पदवी, पदव्युत्तर, फेलोशिप आणि विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना असून, प्रत्यक्ष वनतारा प्रकल्पातील अनुभव अभ्यासक्रमात समाविष्ट केला जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची तरतूदही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सरकारी यंत्रणांवर पारंपरिकपणे असलेली वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी लक्षात घेता, खासगी उद्योगसमूहाकडून या क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक पाऊल उचलले जाणे ही लक्षणीय घडामोड मानली जात असून, ‘उद्योगविश्व आता जंगलाच्या अभ्यासालाही दिशा देणार का?’ असा सवालही उपस्थित होत आहे.

गुजरातमधील जामनगर येथील वनतारा

वनतारा विद्यापीठ विविध शैक्षणिक शाखांना एकत्र आणून प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण देईल. वनताराच्या प्रत्यक्ष कार्याचा अनुभव अभ्यासक्रमात समाविष्ट करून जागतिक स्तरावरील प्रशिक्षण आणि संशोधनाला चालना दिली जाईल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीही उपलब्ध असतील.

वनतारा ही जामनगर, गुजरात येथे कार्यरत वन्यजीव बचाव, पुनर्वसन, आरोग्यसेवा आणि संरक्षणासाठी समर्पित संस्था आहे. आधुनिक पशुवैद्यकीय तंत्रज्ञान, वैज्ञानिक संशोधन आणि प्राणी कल्याण यांचा समन्वय साधत वनतारा विविध प्रजातींच्या प्राण्यांसाठी उपचार आणि दीर्घकालीन काळजी पुरवते. तसेच संरक्षण प्रजनन, प्रजाती पुनर्स्थापना आणि पुनर्वन्यीकरणासाठीही ती कार्यरत आहे.