नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत केवळ आमच्याच नव्हे तर त्यांच्या पक्षातील नेते व आमदारांनाही शंका असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. ते मंगळवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

अजित पवार मुंबईहून बारामतीकडे येत असताना त्यांचा विमान अपघात झाला होता. बारामती विमानतळ परिसरात धुके असल्याने वैमानिकाला धावपट्टी न दिसल्याचा प्राथमिक दावा करण्यात आला होता. मात्र, याच मुद्द्यावर देशमुख यांनी संशय व्यक्त केला. अपघातापूर्वी विमान हवेतच तिरके झाल्याचा चित्रफित समोर आल्याचे त्यांनी नमूद केले. हा व्हिडीओ लांबून चित्रीत करण्यात आला असल्याने, धुके असल्यास असे चित्रीकरण शक्य होते का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या घटनेची चौकशी केवळ नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) न होता, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्रपणे व्हावी, अशी मागणी देशमुख यांनी केली. तसे झाल्यासच सत्य समोर येईल, असे ते म्हणाले.

दरम्यान, हा अपघात संशयास्पद असल्याचे मत व्यक्त करताना, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना छोट्या व खासगी विमानाने प्रवास टाळण्याचा सल्ला देणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. गडकरी यांची विमानतळावर भेट झाल्यास हा सल्ला देईन, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली.

दुखवटा संपल्यानंतर या संदर्भातील सविस्तर माहिती जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिनीकरणासंदर्भात १४ बैठका झाल्या असून, त्यातील काही बैठकींना आपणही उपस्थित होतो, असा दावा त्यांनी केला. या बैठकींमध्ये कोण उपस्थित होते आणि काय चर्चा झाली, याची माहिती पुढे उघड केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.