नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार आणि आमदार फुटणार असल्याचा दावा माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या वक्तव्याला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आत्राम यांच्यावर टीकेची झोड उठवली.
आत्राम यांच्या दाव्यावर देशमुखांचा पलटवार
धर्मराव बाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातील काही विद्यमान तसेच माजी खासदार त्यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख यांनी हा दावा पूर्णपणे तथ्यहीन आणि निराधार असल्याचे म्हटले. केवळ राजकीय प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारची विधाने केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
देशमुख म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातील नेते आणि कार्यकर्ते पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकजुटीने काम करत आहेत. त्यामुळे पक्षातील आमदार किंवा खासदार फुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
‘घरातील परिस्थितीकडे आधी लक्ष द्या’
आत्राम यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना देशमुख यांनी वैयक्तिक पातळीवरही टोला लगावला. आत्राम यांनी इतर पक्षांतील नेत्यांना फोडण्याच्या चर्चा करण्यापूर्वी स्वतःच्या घरातील राजकीय परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.
आत्राम यांची कन्या सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय असल्याचा उल्लेख करत, आधी आपल्या मुलीला तुतारी चिन्हाच्या पक्षातून फोडून दाखवा आणि त्यानंतर आमदार-खासदार फोडण्याच्या गोष्टी करा,असा उपरोधिक सल्ला देशमुख यांनी दिला.
आत्राम यांनी काय केला होता दावा?
धर्मराव बाबा आत्राम यांनी माध्यमांशी बोलताना विकासाच्या मुद्द्यावर अनेक नेते त्यांच्या पक्षाकडे आकर्षित होत असल्याचा दावा केला होता. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत होत असल्याचे सांगत त्यांनी काही माजी खासदारांसह विद्यमान खासदारदेखील पक्षात येऊ शकतात, असे म्हटले होते. मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी सत्तेसोबत राहण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी आगामी काळात पक्षवाढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता.
१२ डिसेंबरची मुदतही जाहीर
संभाव्य पक्षप्रवेशाबाबत बोलताना आत्राम यांनी १२ डिसेंबरपर्यंत काही खासदार पक्षात येऊ शकतात, असा दावाही केला होता. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, देशमुख यांनी आत्राम यांचे वक्तव्य केवळ चर्चेत राहण्यासाठी करण्यात आले असल्याचे सांगत त्यामध्ये कोणतेही ठोस तथ्य नसल्याचा पुनरुच्चार केला. दोन्ही नेत्यांच्या या शाब्दिक चकमकीमुळे राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
