नंदग्राम योजना अद्याप कागदावरच

नागपूर : शहरातील गोठय़ांची संख्या बघता महापालिकेने नंदग्राम योजनेची घोषणा केली. मात्र ही घोषणा केवळ कागदावर असल्यामुळे  अनेक भागातील मोकळ्या मैदानात आता जनावरांचा वावर वाढला आहे. एकीकडे शहरातील  मैदाने खेळांडूसाठी चांगली केली जात असताना गेल्या काही दिवसात त्या ठिकाणी  जनावरांचा वावर बघता मैदाने जनावरांचे गोठे होतात की काय असे वाटत आहे.

रस्त्यावरून  हटवले जात असल्यामुळे आता  मोकळ्या मैदानात जनावरांना सोडले जात आहे. दोन वर्षांपूर्वी दक्षिण नागपुरात अशाच एका जनावरांच्या मालकाने महापालिकेच्या एका मोकळ्या भूखंडावर  गाईचा गोठा तयार करून ती जागा हडपण्याचा प्रयत्न केला होता. मात्र  तो प्रयत्न परिसरातील नागरिकांनी हाणून पाडला. आता शहरात पुन्हा जनावरांचा वावर वाढला  आहे. नंदनवन, वर्धमाननगर, महाल, सक्करदरा आदी भागातील मैदानात एकीकडे मुले खेळत असताना जनावरांचा या ठिकाणी वावर असतो. जनावरांना तेथून बाहेर काढले तर  जनावरांचे मालक अरेरावीची भाषा करतात. महापालिकेकडे या संदर्भात अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत मात्र त्यावर कुठलीच कारवाई होत नाही. मैदाने व्यवस्थित असली तरी मैदानाच्या इतर भागात जनावरांमुळे पडलेले खड्डे, उंच-सखल भागामुळे खेळाडूंना निर्माण झालेला धोका, पाण्याचा निचऱ्याची समस्या, लाईट व रात्री वॉचमनचा अभाव कायम आहे. वाठोडा, मानेवाडा, वर्धमाननगर, जरीपटका, इंदोरा, जयताळा, रामनगर आदी भागातील मैदानात दररोज सकाळी, सायंकाळी फिरणाऱ्यांची व खेळायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या काही दिवसात मैदाने चांगली केली जात असल्याचा दावा केला जात असला तरी मैदानातील अवस्थेत फारशी सुधारणा झालेली नाही.