नागपूर : उपचारादरम्यान रुग्ण दगावल्यानंतर डॉक्टरांना धमकी देऊन १२ लाखांची खंडणी मागणाऱ्यांविरोधात सबळ पुरावे सादर करूनही कायदेशीर कारवाई न करता कर्तव्यात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत पाचपावलीचे ठाणेदार अनिरुद्ध पुरी यांच्यावर गुरुवारी तडकाफडकी निलंबन आणि बदलीची दुहेरी कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ही कारवाई करताना सर्व अधिकाऱ्यांच्या देखत यापुढे कर्तव्यात कुठलीही हयगय केली जाणार नाही, असे अशी तंबी अधिकाऱ्यांना दिल्याने पोलीस दलाचे धाबे दणाणले आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे….?
पाचपावली पोलीस हद्दीतील कामठी रोडवरील डॉ. बी. के. मुरली यांच्या होप रुग्णालयात ५ सप्टेंबर रोजी हा खंडणीचा प्रकार घडला होता. डॉ. मुरली यांच्याकडे विठ्ठल साठे (५७) हे ३० ऑगस्टला उपचाराला आले. पायाला गँगरीन झाल्याने ५ सप्टेंबरला उपचारादरम्यान साठे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची तसेच रुग्णालय पाडून टाकण्याची धमकी देत प्रकरण मिटविण्यासाठी एका राजकीय पक्षाच्या जिल्हा प्रमुखासह ८ जणांनी डॉ. मुरली यांना प्रकरण मिटवण्यासाठी दबाव आणत १२ लाख रुपयांची मागितली होती.
महिन्याभरापूर्वी केली होती तक्रार…
दरम्यान डॉ. मुरली यांच्यासह रुग्णालय व्यवस्थापनाने याची पाचपावली पोलिसांकडे महिन्याभरापूर्वी रितसर तक्रार केली. खंडणी मागणाऱ्यांसंदर्भातले सगळे पुरावे देखील ठाणेदारांना सादर करण्यात आले. मधल्या काळात ३०० जणांचा जमाव पाचपावली ठाण्यातही गेला. तरीही ठाणेदार पुरी यांनी ३० सप्टेंबरपर्यंत गुन्हा दाखल केलाच नाही. दरम्यान पोलीस आयुक्तांनी बोलावलेल्या डॉक्टरांच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित झाला. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी माहिती मागवून घेत पाचपावलीचे ठाणेदार अनिरुद्ध पुरी यांच्यावर कर्तव्यात हयगय केल्याचा ठपका ठेवत त्यांना पुढील चौकशी होईपर्यंत निलंबित करून त्यांची मुख्यालयात रवानगी केली. पुरी यांच्या जागी हिंगणा येथील ठाणेदार जितेंद्र बोबडे यांची पाचपावलीचे ठाणेदार म्हणून बदली करण्यात आली आहे.
खंडणी मागणाऱ्या या सात जणांवर गुन्हा
पोलीस आयुक्तांनी खडसावताच पाचपावली पोलिसांनी गुरुवारी शिवसेनेच्या सात पदाधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. यात युवासेना जिल्हाप्रमुख शरद सरोदे (४५), महिला प्रमुख मनीषा पापडकर (४०), मुल्ला सिंह गौर (४०), प्रतीक बहुगुणा (४०), पंकज खिची (४०), महेश ढोले (३०), शुभम साठे (२५) अशी आरोपींची नवे आहेत.
पोलीस आयुक्त काय म्हणाले….
खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यात तक्रारदाराने सबळ पुरावे सादर केले होते. शिवाय खंडणी मागणारे सातत्याने रुग्णालयात जाऊन गोंधळ घालत असताना ठाणेदारांनी तत्काळ कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित होते. अशा प्रकारची दिरंगाई पोलीस दलाची शिस्त भंग करणारी आहे. याची सखोल चौकशी केली जात आहे असे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी लोकसत्ताशी साधलेल्या संवादात स्पष्ट केले.
