अकोला : आयुषच्या आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी अभ्यासक्रमास प्रवेश न मिळालेले हजारो विद्यार्थी नर्सिंग प्रवेशासाठी इच्छूक असतात. मात्र, त्याचीही मुदत संपल्याने ते प्रवेशापासून वंचित होते. ही अडचण लक्षात घेऊन ‘प्रायव्हेट नर्सिंग स्कुल अॅन्ड कॉलेज मॅनेजमेंट असोशिएशन’चे अमरावती विभागीय अध्यक्ष डॉ.सुधीर ढोणे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.
शिवाय राजकीय पातळीवर देखील पाठपुरावा केला. अखेर इंडियन नर्सिंग कौन्सिल नवी दिल्ली यांनी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रक्रियेस ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे नर्सिंग क्षेत्रातील एएनएम, जीएनएम, बीएससी (नर्सिंग), पी.बी.बीएससी (नर्सिंग) अभ्यासक्रमास प्रवेशोच्छूक राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
आयुर्वेद, युनानी व होमिओपॅथी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया २० डिसेंबरपर्यंत सुरू होती. या अभ्यासक्रमास प्रवेश न मिळालेले विद्यार्थी नर्सिंगच्या विविध अभ्यासक्रमाकडे वळतात. नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ३० नोव्हेंबर रोजी संपुष्टात आल्याने हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित झाले होते.
या संदर्भात राज्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे अप्पर मुख्य सचिव धीरज कुमार व वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यासाठी इंडियन नर्सिंग कौन्स ल यांच्याशी पत्रव्यवहार करण्याची मागणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी तसे पत्रही पाठवले. मात्र, प्रवेशाची अंतिम मुदत वाढवल्या गेली नाही. डॉ. सुधीर ढोणे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या नावाने पत्र घेऊन प्रवेशाची अंतिम मुदत वाढविण्याची मागणी केली.
डॉ. सुधीर ढोणे यांनी ‘प्रायव्हेट नर्सिंग स्कूल अॅन्ड कॉलेज मॅनेजमेंट असोशिएशन’ च्यावतीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. प्रवेशाची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्याची मागणी त्यात करण्यात आली. दिल्ली उच्च न्यायालयाने इंडियन नर्सिंग कौन्सिलला प्रवेशाची अंतिम मुदत वाढविण्याविषयी विचारणा केली. यावर इंडियन नर्सिंग कौन्सिलने सकारात्मक निर्णय लवकरच घेण्याची हमी दिली. २४ डिसेंबरला रात्री प्रवेशाची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्याचे पत्र काढण्यात आले. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले असून त्यांना आणखी संधी उपलब्ध झाली. नर्सिंग असोशिएशन तर्फे अॅड. अमोल कारंडे, अॅड. माणिक डोगरा, अॅड. संचित सिंग, अॅड. सार्थक गुप्ता, अॅड. उत्कर्ष कोकचा व अॅड. ध्रुव पांडे यांनी बाजू मांडली.
