नागपूर : सध्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. हे करताना तलाठय़ांनी शेतकऱ्यांच्या माहितीसाठी गावात आल्याची घोषणा तेथील मंदिर, मशिदीच्या भोंग्यातून करावी, अशी सूचना राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली.

नागपूर विभागातील अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सत्तार म्हणाले, नागपूर विभागात  जुलै आणि ऑगस्टमधील पंचनामे निम्मे शिल्लक असून ते दोन ते तीन दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये म्हणून शासन कटिबद्ध आहे. लोकप्रतिनिधींनी पंचनाम्याबाबत तक्रारी केल्या. त्यामुळे आता तलाठय़ांना गावात गेल्यावर मंदिर, मशिदीतून ते आल्याची घोषणा करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत.

पंचनाम्यासाठी तलाठी शेतापर्यंत जात नसल्याच्याही तक्रारी आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करायला व तलाठय़ांना त्यावर पंचनामा करतानाचे छायाचित्र टाकण्याची सूचना केली आहे. सोबतच झालेल्या पंचनाम्याचे वाचन  ग्रामसभेत करण्यासही सांगितले आहे. मदतीबाबत सोमवारी मी सभागृहात निवेदन करणार आहे. सध्या नांदेडमधील शेतकरी गोगलगाय रोगाने त्रस्त आहेत. त्यामुळे तेथे कृषी तज्ज्ञांची चमू पाठवून उपाय केले जातील.  शेतीच नव्हे, कोणतीही जमीन खरडून गेली असेल, पाणी साचले असेल, रस्ते खरडले असतील तर त्यालाही मदत केली जाईल, असेही सत्तार म्हणाले. याप्रसंगी खासदार कृपाल तुमाने, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे व इतरही लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पीकविम्याच्या जाचक अटीबाबत पंतप्रधानांना भेटू

शेतकऱ्यांना मदत मिळताना पीकविम्याच्या जाचक अटींची अडचण येते. त्यामुळे  अडचणींच्या नोंदी कृषी संचालक व महसूल आयुक्तांना सादर करण्यास सांगितले आहे. यानंतर केंद्र सरकारला प्रस्ताव देऊन या अटी रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जातील, प्रसंगी पंतप्रधानांचीही भेट घेऊ, असेही सत्तार म्हणाले.

शरद पवारांचे मार्गदर्शन घेणार

शरद पवार  यांनी कृषी क्षेत्रात खूप काम केले आहे. त्यामुळे पवार यांच्यासह शेती विषयक ज्ञान असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेही मार्गदर्शन घेणार आहे. सोबतच मंत्री म्हणून माझ्यासह जिल्हाधिकारी, वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक दिवस शेतकऱ्यांसोबत घालवण्याचा उपक्रम सुरू केला जाईल, असेही सत्तार यांनी सांगितले.