‘लोकसत्ता’ची दखल
नागपूर : धनाढय़ दाम्पत्यांना लाखो रुपयांत नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळय़ांचा उपराजधानीत सुळसुळाट आहे. ‘लोकसत्ता’ने ही बाब उघडकीस आणताच पोलीस विभागाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. गुन्हे शाखेने (एचटीयू) बाळविक्री करणाऱ्या आणखी एका टोळीला जेरबंद केले.
या टोळीने अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाची लाखो रुपयात विक्री केली. सीताबर्डी पोलीस ठाण्यात टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाऊल्ला खान जन्गुमिया खान (६२, राठोड लेआऊट, अनंतनगर, गिट्टीखदान), श्वेता रामचंद्र सावळे ऊर्फ आयशा मकबुल खान (४३, लालबर्रा, बालाघाट, मध्यप्रदेश), रंजना हरीश भगत (५८, आठरस्ता चौक, लक्ष्मीनगर) आणि सरिता रामचंद्र सोमकुंवर (५८, सुरेंद्रगड, गिट्टीखदान) अशी टोळीतील सदस्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेने आतापर्यंत नवजात बाळ विक्री करणाऱ्या तीन टोळय़ा उघडकीस आणल्या आहेत. आरोपी सरिता सोमकुंवर हिला बाळ विकत घ्यायचे होते. तिने टोळीचा म्होरक्या समाऊल्ला खान याच्याशी घरभाडेकरू छाया मार्फत संपर्क साधला. ३० सप्टेंबर २०१९ रोजी सरिताने धंतोलीतील एका रुग्णालयात परिचारिका असलेल्या श्वेता रामचंद्र सावळे ऊर्फ आयशा खान आणि रंजना भगत यांना बाळ विकत दिल्यास ५ लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. समाऊल्ला, रंजना आणि श्वेता यांनी अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाची विक्री करण्याची योजना आखली. सरिता सोमकुंवर हिच्याकडून ५ लाख रुपये घेतल्यानंतर १० दिवसांचे बाळ रंजना आणि श्वेता यांनी सरिताला सोपवले. गेल्या तीन वर्षांपासून ते बाळ सरिता हिच्या ताब्यात होते. वयाच्या ५५ व्या वर्षी तिने बाळाला जन्म दिल्याचे ती सांगत होती. त्यामुळे तिच्या ३८ वर्षांच्या मुलाला संशय आला. त्याने आईविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली.
पाच लाखांत विक्री
एका युवतीने अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाला अनाथालयात ठेवण्याची तयारी केली होती. परंतु, या अनाथालयाशी संबंधित समाऊल्ला याने दोन परिचारिकेला हाताशी धरून त्या बाळाची पाच लाखांत विक्री केली.
डॉक्टरांची भूमिका
धंतोली परिसरातील एका मोठय़ा रुग्णालयात बाळ विक्रीचा सौदा ठरला. त्या रुग्णालयाने ५५ वर्षांच्या सरिता हिनेच बाळाला जन्म दिल्याचे सिद्ध करण्यासाठी प्रसूती झाल्याचे प्रमाणपत्र दिले. तसेच बाळाचे सर्व बनावट कागदपत्र तयार करून सरिता हिच जन्मदात्री असल्याचे भासवले. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.