scorecardresearch

देशात लवकरच आणखी एक हत्ती अभयारण्य; तमिळनाडूतील अगस्तियामलाईला मान्यता

हत्तीच्या संरक्षणासाठी तमिळनाडूतील अगस्तियामलाई हे आणखी एक हत्ती अभयारण्य होणार आहे.

देशात लवकरच आणखी एक हत्ती अभयारण्य; तमिळनाडूतील अगस्तियामलाईला मान्यता
संग्रहित छायाचित्र

नागपूर : हत्तीच्या संरक्षणासाठी तमिळनाडूतील अगस्तियामलाई हे आणखी एक हत्ती अभयारण्य होणार आहे. त्यामुळे अभयारण्यांची संख्या आता ३२ होणार असून हत्तींच्या संवर्धनासाठी आणखी एक हजार १९७ चौरस किलोमीटर क्षेत्र जोडले जाणार आहे.

देशात दरवर्षी ५०० लोक हत्तींच्या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडतात, तर सुमारे १०० हत्तींना सूड घेण्यासाठी ठार केले जाते.  संसाधनांच्या स्पर्धेमुळे हा संघर्ष वाढत चालला आहे. त्यावर दीर्घकालीन उपाय शोधण्यासाठीच देशातील हत्ती कॉरिडॉरचा आढावा घेतला जात आहे.

जुलैमध्ये संसदेत सादर झालेल्या आकडेवारीनुसार, तीन वर्षांत देशात हत्तींच्या हल्ल्यांत एक हजार ५७८ लोक मृत्युमुखी पडले. याच कालावधीत सुमारे २२ हत्तींचा वीजप्रवाहामुळे, ४५ हत्तींचा रेल्वे अपघातात, ११ हत्तींचा विषबाधेमुळे मृत्यू झाला, तर २९ हत्तींची शिकार करण्यात आली.

किती हत्ती, किती अभयारण्ये?

’सन २०१७मध्ये केलेल्या गणनेनुसार देशात २९ हजार ९६४ हत्ती.

’गेल्या आठ वर्षांत हत्ती अभयारण्यांच्या संख्येत वाढ सध्या ३१ अभयारण्ये.

’लवकरच आणखी एकाची भर, संख्या ३२ वर जाईल.

’१४ राज्यांमधील हत्ती अभयारण्याचे क्षेत्रफळ ७६,५०८ चौ. कि.मी.

राज्य – हत्ती अभयारण्ये

आंध प्रदेश – एक

अरुणाचल प्रदेश – दोन

आसाम – पाच

छत्तीसगड – दोन

झारखंड – एक

कर्नाटक – दोन

केरळ – चार

मेघालय – एक

नागालँड – दोन

ओदिशा – तीन

तमिळनाडू – चार

उत्तर प्रदेश – एक उत्तराखंड – एक

प. बंगाल – दोन

आव्हाने असूनही देशात हत्तीच्या संवर्धनात उल्लेखनीय कामगिरी होत आहे. या बाबतीत देश अग्रेसर आहे. आशियाई हत्तींची संख्या सर्वाधिक आणि स्थिर आहे. ६० टक्क्यांहून अधिक जंगली आशियाई हत्ती भारतात आहेत.

– भूपेंदर यादव, केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ न्यूज ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Another elephant sanctuary country soon acknowledgment tamil nadu ysh

ताज्या बातम्या