एका आरोपीला खापा पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक व त्याच्या वाहनाची जप्ती टाळण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस शिपायाने ४० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर शुक्रवारी ३५ हजार रुपये लाच स्वीकारताना दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
अमोल कलेगुरवार (२८) ह. मुक्काम अधिकारी गाळे, खापा आणि दिनेश गिरडे (३२) ह. मुक्काम खापा पोलीस गाळे, असे दोन्ही लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
हेही वाचा – नागपूर – पोलीस शिपाई रायफल उभी ठेवून स्वच्छ करीत होता, अचानक…
हेही वाचा – नागपूर विभागातील ४६९ पैकी ३९१ वस्त्यांची जातिवाचक नावे हद्दपार
पोलिसांच्या माहितीनुसार, एका ३८ वर्षीय व्यक्तीवर खापा पोलीस ठाण्यात चोरीशी संबंधित गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास कलेगुरवार आणि गिरडे यांच्याकडे आहे. याचा फायदा घेत दोघांनीही आरोपीला तुझी अटक टाळण्यासह तुझ्या गाडीची जप्ती टाळायची असल्यास ४० हजार रुपये देण्याची मागणी केली. फिर्यादीला लाच द्यायची नसल्याने त्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून सापळा रचून दोन्ही आरोपीला रंगेहात ३५ हजार रुपये लाच घेताना पकडले गेले. दोघांवर खापा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.