लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : शेत जमिनीचे पोट हिस्से करून ‘क’ प्रत देण्याचा बदल्यात ६० हजारांची लाच घेणाऱ्या कामठी सिटी सर्व्हे कार्यालयातील लाचखोर भू-करमापकास लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून रंगेहात अटक केली. एसीबीच्या या कारवाईनंतर कामठी सिटी सर्व्हे कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्याच्या प्रचंड खळबळ उडाली.

वैभव अशोकराव पळसापूरे (५१) असे लाचखोर भू-करमापकाचे नाव आहे. तो कामठी येथील उपअधीक्षक, सिटी सर्व्हे (भूमी अभिलेख) कार्यालयात कार्यरत होता. प्राप्त तक्रारीनुसार, ३० वर्षीय फिर्यादी यांच्या पत्नीसह तिच्या बहिणीच्या नावे पावनगाव, कामठी जि. नागपूर येथे भूमापन क्रमांक ४०/१ मधील ३.२७ हेक्टर शेत जमीन आहे. या जमिनीचे पोट हिस्से करून त्याची ‘क’ प्रत देण्यासाठी वैभव अशोकराव पळसापूरे, मोजणी कर्मचारी यांनी पडताळणी वेळी ६० हजार रुपये लाचेची मागणी करून प्रकरण प्रलंबित ठेवले होते. लाचेसाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला. शेवटी तक्रारकर्त्यास लाच द्यायची नसल्याने त्यांनी एसीबी कार्यालय गाठले. एसीबीने लगेच त्यांच्या तक्रारीची दखल घेत पडताळणी केली आणि वेळीच सापळा रचला. यावेळी लाचखोर वैभव पळसापूरेला ६० हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी एसीबीने पळसापूरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आणखी वाचा-राज्यातील शाळांमध्ये ‘सखी सावित्री’ समिती कागदोपत्रीच; अडीच वर्षांपासून…

लाचेशिवाय हलत नाही फाईल

गेल्या काही महिन्यांपासून या कार्यालयात भ्रष्टाचार चांगलाच फोफावला होता. कुठलेही काम शासनाने ठरवून दिलेल्या कालावधीत होत नव्हते. येथील वरिष्ठसुद्धा प्रकरणे निर्धारित कालावधीत निकाली न काढता प्रलंबित ठेवायचे. संगनमताने नागरिकांची अडवणूक केली जायची. अशा प्रकारे येथे कुठलेही काम लाच घेतल्याशिवाय होत नव्हते.

एसीबीला आव्हान

सध्या नागपूर शहरातील विविध शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार आणि लाचखोरी वाढली आहे. आरटीओ, पोलीस, महसूल, वीज विभाग, शिक्षण विभाग, जिल्हा परीषद, महापालिका आणि तहसील कार्यालयातही लाच दिल्याशिवाय कामे होत नाही. त्यामुळे नव्याने रुजू झालेले एसीबीचे अधिकारी दिगंबर प्रधान यांच्यासमोर आव्हान उभे ठाकले आहे. शासकीय कार्यालयात लाचखोरीविरुद्ध लावलेली भीत्तीपत्रके शासकीय कर्मचारी फाडून टाकतात. तसेच लाच मागण्यासाठी विविध शक्कल वापरतात. त्यामुळे एसीबीला आक्रमक भूमिका घेणे गरजेचे आहे.