जिल्ह्यातील सिरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष;शहरातील स्थिती ग्रामीणपेक्षा चांगली

महेश बोकडे

नागपूर : पहिल्या व दुसऱ्या लाटेत विदर्भातील सर्वाधिक करोनाग्रस्त नागपुरात नोंदवले गेले. तर राज्यात ओमायक्रॉनचा शिरकावानंतर जिल्ह्यात पुन्हा चिंता वाढली असतानाच येथील सिरो सर्वेक्षणाच्या आकडेवारीने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे. सर्वेक्षणात नागपूर जिल्ह्यातील ८० टक्के नागरिकांत करोनाविरुद्ध लढण्याचे प्रतिपिंड (अ‍ॅन्टिबॉडी) विकसित झाल्याचे आढळले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी या सर्वेक्षणाचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन झाले. त्यात प्रतिपिंड आढळलेल्यांमध्ये नागपूरच्या शहरी भागातील सर्वाधिक ८४ टक्के तर ग्रामीणच्या ७४ टक्के अशा एकूण ८० टक्के नागरिकांचा समावेश होता. नागपूरच्या शहरी भागात १८ वर्षांहून अधिक वयाच्या ९८ टक्केच्या जवळपास तर ग्रामीणच्या ९० टक्केच्या जवळपास अशा एकूण जिल्ह्यात ९४ ते ९५ टक्केच्या जवळपास नागरिकांना लसीची मिळालेली किमान एक मात्रा आणि येथे दुसऱ्या लाटेत मोठय़ा प्रमाणावर झालेल्या संक्रमनामुळे प्रतिपिंड अधिक आढळल्याचा अंदाज आहे.  

 जिल्ह्यात ८० टक्केहून अधिक नागरिकांत करोनाविरुद्ध लढण्याचे प्रतिपिंड आढळल्याने नागपूरकरांची हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचा काही डॉक्टरांचा अंदाज आहे. तर करोनाचे वेगवेगळे रूप विकसित होत असल्याने हे प्रतिपिंड नवीन ओमायक्रॉनसह इतर नवीन रुपावर कसे परिणाम करेल हे सांगणे कठीन असल्याचा दावा काही डॉक्टरांनी केला. दरम्यान या विषयावर मेडिकलसह आरोग्य विभागातील एकही अधिकारी बोलायला तयार नाही. सर्व विभागीय आयुक्त कार्यालयाकडे बोट दाखवत आहेत.

जिल्ह्यात ६,१०० व्यक्तींचे नमुने तपासले

सिरो सर्वेक्षणासाठी जिल्ह्यातील ६ हजार १०० व्यक्तींचे नमुने घेण्यात आले होते. त्यात नागपूर महापालिका हद्दीतील १० वेगवेगळय़ा झोनमधील प्रत्येकी ४ वार्डातील ७५ ते ८० जणांचे एकूण ३ हजार १०० नमुने गोळा करण्यात आले होते. तर ग्रामीणमध्ये १३ तहसीलमधून प्रत्येकी १ मुख्यालय व प्रत्येक तहसीलमधील दोन गावातून एकूण ३ हजार नमुने गोळा करण्यात आले होते. नमुने घेताना ६ ते १२, १२ ते १८, १८ ते ६० आणि ६० हून अधिक अशा चार वेगवेगळे वयोगट निश्चित होते. यावेळी करोना प्रतिबंधात्मक लस घेतलेले, करोना होऊन बरे झालेल्यांचेही नमुने घेतले गेले होते. त्यात प्रथमच जिल्ह्यात लहान मुलांचेही नमुने घेण्यात आले.

दुसऱ्या सर्वेक्षणात ३५ टक्के नागरिकांत प्रतिपिंड नागपुरात प्रथम जून- २०२० मध्ये पहिले सिरो सर्वेक्षण झाले. त्यात करोना होऊन गेलेल्यांचा समावेश नव्हता. यावेळी शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागातील नागरिकांच्या नमुन्यांची संख्या कमी होती. यावेळच्या चाचणी संचाला अमेरिकन एफडीएकडून काळय़ा यादीत टाकण्यात आल्यावर मात्र याबाबतचा निष्कर्ष घोषित केला गेला नाही. परंतु त्यावेळी सुमारे ४ टक्के जणांमध्ये प्रतिपिंड आढळले. त्यानंतर ऑक्टोबर २०२० मध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सिरो सर्वेक्षणासाठी ४ हजार नागरिकांचे नमुने घेण्यात आले. त्यात २ हजार नागरिक शहरातील तर २ हजार नागरिक ग्रामीणचे होते. यावेळी शहरी भागात ४९.८ टक्के तर ग्रामीणला २१ टक्के आणि दोन्ही मिळून जिल्ह्यात ३५ टक्के नागरिकांत प्रतिपिंड आढळले. या दोन्ही वेळी १८ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींचेच नमुने घेण्यात आले होते.