गडचिरोली : देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पूर्वी देशातून नक्षलवाद हद्दपार करण्याची घोषणा केली. त्यानंतर देशभरात नक्षलविरोधी मोहीम अधिक गतिमान करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील सर्वाधिक प्रभावित भागात सुरक्षा दलाने केलेल्या कारवायांमुळे मागील तीन वर्षात नक्षल चळवळीला मोठे नुकसान झाले. त्यामुळे कोंडीत सापडलेल्या शिल्लक नक्षल नेत्यांनी चळवळ पुनरुज्जीवित करण्यासाठी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाकडे धाव घेतली. मात्र, तेथेही सुरक्षा यंत्रणांनी मागील दोन दिवसात केलेल्या कारवाईत हिडमा सारखा प्रमुख नेता मारल्या गेल्याने नक्षल्यांचा शेवटचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे.
गुप्तचर यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षलवादी चळवळीला पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नात काही प्रमुख नक्षलवादी नेत्यांनी आंध्र प्रदेशात घुसण्याची योजना आखली होती. मात्र, तीन राज्यांच्या सीमेवर नक्षलवाद्यांच्या हालचालींबद्दल मिळालेल्या अचूक माहितीमुळे मारेदुमिल्ली परिसरात झालेल्या चकमकीत नक्षल चळवळीतील सर्वाधिक महत्त्वाच्या लष्करी फळीचा प्रमुख कुख्यात नक्षल नेता हिडमा याच्यासह दोन दिवसात १५ नक्षलवादी ठार झाले.
महाराष्ट्र-छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमांमुळे मागील काही महिन्यांपासून देवजी व हिडमासह शेकडो नक्षलवादी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात आश्रय घेण्याच्या प्रयत्नात होते. काही काळ या भागात राहून नक्षल चळवळ पुनरुज्जीवित करण्याची त्यांची योजना होती. मात्र, तेथील नक्षलविरोधी पथक ‘ग्रेहॉऊंड्स’ने केलेल्या कारवाईत हिडमासह प्रमुख नक्षल नेते ठार झाले.
देवजीही सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे. त्यामुळे शेवटची घटका मोजत असलेल्या नक्षल चळवळीचा हाही प्रयत्न निष्फळ ठरल्याची चर्चा सुरक्षा दलाच्या वर्तुळात आहे. मागील वर्षभरात एकट्या छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकींमध्ये किमान २५२ नक्षलवादी मारले गेले. २०२४ मध्येही सुरक्षा दलांनी छत्तीसगडमध्ये २१९ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. सर्वोच्च नेता बसवराजूचाही समावेश आहे. दीड महिन्यांपूर्वी सर्वोच्च नक्षल नेता सोनू उर्फ भूपती, सतीश याच्यासह तब्बल २७० नक्षल नेत्यांनी आत्मसमर्पण केले. यासोबत संघटनेत शस्त्रसंधीवरून अजूनही वाद सुरु आहे.
सहा कोंद्रीय समिती सदस्य रडारवर
सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या आक्रमक कारवायांमुळे नक्षलवादी चळवळ कमकुवत झाली आहे. त्यामुळेच हिडमा व देवजीने आंध्र प्रदेशात नवीन तळ शोधण्याचा प्रयत्न सुरू केला होता. नक्षलवाद्यांचे हे प्रयत्न केवळ सीमावर्ती जंगलांपुरते मर्यादित नव्हते. पोलिसांनी कृष्णा आणि गोदावरी परिसरात एकाच वेळी केलेल्या कारवायांमध्ये विजयवाडा, काकीनाडा आणि एलुरू या शहरांतून ३१ नक्षलवाद्यांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये सीपीआय (माओवादी) च्या केंद्रीय समिती सदस्य थिप्पीरी तिरुपती ऊर्फ देवजी याच्या सुरक्षेतील नऊ जण आणि दक्षिण बस्तर विभागीय समितीच्या सदस्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नक्षल संघटनेत शिल्लक असलेले सहा केंद्रीय समिती सदस्य सुरक्षा यंत्रणाचा रडारवर आहेत. यात सर्वोच्च नेता देवजी, गणपती, मध्य प्रदेशात सक्रिय असलेला रामधेर, तेलंगणातील गणेश उईके, ओडिशा येथील मिशीर बेसरा आणि झारखंड मधील पतीराम मांझी या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. त्यातील गणपती हा फिलिपिन्स मध्ये पळून गेल्याची चर्चा आहे.
नक्षलवाद्यांनी लयास जात असलेली हिंसक चळवळ पुन्हा जिवंत करण्याचा अयशस्वी प्रयत्न करू नये. त्यांना अजूनही आत्मसर्पणाची संधी आहे. तो मार्ग स्वीकारून त्यांनी मुख्य प्रवाहात यावे. –संदीप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान
