गडचिरोली : प्रेमसंबंधात असताना प्रेयसीने शिक्षण सोडण्यास नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने थेट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत घुसून विद्यार्थिनीला मारहाण केल्याची घटना आरमोरी येथे घडली. विद्यार्थिनीचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावून घेतल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय विद्यार्थिनी आरमोरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहे. तिचे भाग्यवान सुरेश धंदरे (२२) याच्यासोबत मागील सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाग्यवान हा विद्यार्थिनीवर शिक्षण सोडण्यासाठी दबाव टाकत होता. ‘कॉलेज बंद कर, अन्यथा मला सोड’, असा तगादा त्याने लावला होता. विद्यार्थिनीने शिक्षण सोडण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर विद्यार्थिनीने त्याच्याशी बोलणे बंद केले.
याच रागातून २८ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास आरोपी मोटारसायकलने थेट आयटीआयच्या आवारात पोहोचला. पार्किंगमध्ये विद्यार्थिनीला गाठून ‘कॉलेज का सोडत नाहीस?’ असा जाब विचारत त्याने तिच्याशी वाद घातला. त्यानंतर सर्वांसमक्ष तिच्या गालावर मारहाण केल्याचा आरोप आहे.
मोबाइल हिसकावून धमकी
मारहाणीनंतर आरोपीने विद्यार्थिनीला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून काही अंतरावर नेले. तेथे तिच्याकडील सुमारे १८ हजार रुपये किमतीचा मोबाइल त्याने हिसकावून घेतला. तसेच या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेनंतर घाबरलेल्या विद्यार्थिनीने वडिलांसह पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास हवालदार भारती बावणे करीत आहेत.
