अमरावती : राज्यात नागरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘नागरी व ग्रामीण लोककल्याण अभियान’ राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत आरोग्य व्यवस्थेचा विस्तार करण्यात येणार आहे. या मोहिमेत रिक्त पदे भरण्यापासून ते महिलांसाठी विशेष ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यापर्यंतच्या अनेक महत्वाकांक्षी उपक्रमांचा समावेश आहे.
नागरी भागात नवीन ‘आपला दवाखाना’
या अभियानांतर्गत राज्यातील महापालिका, नगरपालिकांच्या क्षेत्रात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत ३५१ ठिकाणी नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे आणि २६ ठिकाणी ‘पॉलिक्लिनिक’ कार्यान्वित केली जातील. याशिवाय राज्य योजनेतून ३१ नवीन ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहे.
मोठ्या प्रमाणावर पदभरती
या नवीन आणि विद्यमान आरोग्य संस्थांमधील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी शासनाने विशेष मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची एकूण ६ हजार २५८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. राज्य योजनेंतर्गत (आपला दवाखाना) वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची एकूण ५६५ रिक्त पदे भरली जाणार आहेत. नागरी क्षेत्रांसाठी आशा स्वयंसेविकांची १ हजार ९५ पदे तातडीने भरण्यात येणार आहेत.
दर बुधवारी ‘मेनोपॉज क्लिनिक’
महिलांच्या आरोग्य सुविधेसाठी या अभियानात विशेष तरतूद करण्यात आली आहे. रजोनिवृत्तीच्या (मेनोपॉज) काळात महिलांना होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि हार्मोनल त्रासांवर मात करण्यासाठी राज्यातील जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जेथे स्त्रीरोग तज्ज्ञ उपलब्ध आहेत, तिथे ‘मेनोपॉज’ क्लिनिक’ सुरू केले जाणार आहेत. दर बुधवारी या क्लिनिकमध्ये महिलांची बाह्यरुग्ण तपासणी केली जाईल. येथे स्त्रीरोग तज्ज्ञांकडून मोफत तपासणी, औषधोपचार, मानसिक आरोग्यविषयक समुपदेशन आणि आहार-जीवनशैलीबाबत एकाच छताखाली मार्गदर्शन मिळेल. नागरी भागात आरोग्य चळवळ वाढविण्यासाठी १० हजार १५२ महिला आरोग्य समित्या देखील गठित केल्या जातील.
‘झिरो प्रिस्क्रिप्शन’
शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना बाहेरून औषधे लिहून घेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आवश्यक औषध यादीमधील सर्व औषधे रुग्णांना विनाशुल्क पुरवून ‘झिरो प्रिस्क्रिप्शन’ नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ शासकीय रुग्णालयात घेणाऱ्यांचे प्रमाण १७ टक्क्यांवरून थेट ४० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
