scorecardresearch

यंदा २६ हजार नागरिकांकडून धम्मदीक्षा; गेल्या काही वर्षांच्या तुलनेत दीक्षाभूमीवरील सोहळय़ाला मोठा प्रतिसाद

गेली दोन वर्षे धम्मदीक्षा सोहळय़ावर करोनाचे सावट होते. त्याआधी दरवर्षी या सोहळय़ात दहा ते पंधरा हजार नागरिक धम्मदीक्षा घेत होते.

यंदा २६ हजार नागरिकांकडून धम्मदीक्षा; गेल्या काही वर्षांच्या तुलनेत दीक्षाभूमीवरील सोहळय़ाला मोठा प्रतिसाद
नागपूरची दीक्षाभूमी

देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर : नागपूरच्या दीक्षाभूमीवर दरवर्षी विजयादशमीनिमित्त होणाऱ्या धम्मदीक्षा सोहळय़ामध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेणाऱ्यांची संख्या उत्तरोत्तर वाढत आहे. यंदाच्या सोहळय़ात तीन दिवसांत २६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी धम्मदीक्षा घेतल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या हजारो अनुयायांच्या उपस्थितीत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यावेळी बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना २२ प्रतिज्ञा दिल्या. दरवर्षी देशभरातून लाखो अनुयायी विजयादशमीला नागपूरच्या दीक्षाभूमीवर येतात. यानिमित्ताने तीन दिवस चालणाऱ्या धम्मदीक्षा सोहळय़ात हजारो अनुयायी बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. यंदा दीक्षाभूमीवर २६ हजार ६२३ अनुयायांनी दीक्षा घेतली. त्यात दलित समाजातील अनुयायांसह ओबीसी आणि अन्य समाजातील नागरिकांची संख्या लक्षणीय होती, असे समितीने नमूद केले.

गेली दोन वर्षे धम्मदीक्षा सोहळय़ावर करोनाचे सावट होते. त्याआधी दरवर्षी या सोहळय़ात दहा ते पंधरा हजार नागरिक धम्मदीक्षा घेत होते. यंदा त्यात मोठी वाढ झाली. ही सकारात्मक बाब असून, बुद्धांनी दाखवलेला समतेचा मार्ग स्वीकारण्याकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचे स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी सांगितले. धम्मदीक्षा घेणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडू, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगालसह देशाच्या अन्य भागांतील नागरिकांचा समावेश आहे, असे फुलझेले म्हणाले.

काही वर्षांआधी धम्मदीक्षा घेणाऱ्यांची संख्या दहा ते पंधरा हजारांमध्ये असायची. त्यात बहुतांश अनुयायी हे महाराष्ट्राच्या दलित समाजातील असायचे. मात्र, बुद्धाचा शांती, अहिंसा, समता आणि विज्ञानवादी दृष्टिकोन पटू लागल्याने धम्मदीक्षा घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, धम्मदीक्षा सोहळा अधिक व्यापक होऊ लागला आहे. 

डॉ. सुधीर फुलझेले, स्मारक समितीचे सचिव

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 02:40 IST

संबंधित बातम्या