कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीकडे लक्ष; नागपूर हिवाळी अधिवेशनाबाबत संभ्रम

नागपूर : पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सात डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी  गुरुवारी २५ नोव्हेंबरपासून नागपूर येथे सचिवालय सुरू होणार होते. परंतु सध्या याला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे अधिवेशन येथे होणार? पुढे ढकलणार? की मुंबईत होणार याबाबत संभ्रम कायम आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतरच याबाबत काय ते स्पष्ट होईल. त्यामुळे स्थानिक प्रशासनाचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. मागच्या वर्षी करोनामुळे नागपुरात अधिवेशन न झाल्याने यंदा ते होईलच असे नेते आणि अधिकारी सांगत होते. पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार सात डिसेंबरपासून सुरू होणााऱ्या अधिवेशनासाठी  २५ नोव्हेंबरपासून नागपुरात सचिवालयाचे कामकाज सुरू होणार होते. तसे परिपत्रकही विधिमंडळ सचिवालयाने  ६ ऑक्टोबरला काढले होते. मात्र ९ नोव्हेंबरपासून विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे परिस्थिती बदलली.

दरम्यान, मानेवरील शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल झाल्याने कामकाज सल्लागार समितीची बैठकही पुढे ढकलण्यात आली. तेव्हापासून अधिवेशनाच्या तारखांबाबत व ते नागपुरात होण्याबाबत तर्कवितर्क वर्तवणे सुरू आहे. वि.प. निवडणुका झाल्यावर अधिवेशन होईल, असे ज्याच्यावर  अधिवेशनानिमित्त विविध कामे सोपवण्यात आली ते अधिकारी, कर्मचारी सांगतात तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून अधिवेशन मुंबईतच होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या पार्श्वभूमी वर  विधिमंडळ सचिवालयाने २२ नोव्हेंबरला पुन्हा एक परिपत्रक जारी करून त्यांचे पूर्वीचे (सचिवालय नागपुरात येण्याबाबतचे) परिपत्रक स्थगित करण्यात आल्याचे जाहीर केले.  त्यामुळे गुरुवारपासून नागपुरात सचिवालय सुरू होणार नाही. परिणामी, सध्यातरी अधिवेशनाबाबत संभ्रम कायम आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतरच तो दूर होईल.