नागपूर : नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून अरुण थॉमस फरेरा यांना अटक करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करणे पोलिसांना चांगलेच भोवले आहे. आठ गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर तुरुंगातून बाहेर पडताच परेराला साध्या वेशातील पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, अटकेची कारणे न सांगणे, नातेवाइकांना माहिती न देणे आणि अटकेची आवश्यक कागदपत्रे तयार न करणे, अशा गंभीर त्रुटी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उघड केल्या. पोलिसांच्या या कारवाईमुळे संबंधित व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने राज्य सरकारला दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

आठ गुन्ह्यांत निर्दोष मुक्तता, तरीही तुरुंगाबाहेर पडताच उचलले

अरुण थॉमस फरेरा यांना ८ मे २००७ रोजी नागपुरातील धंतोली पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील अन्य गुन्ह्यांमध्येही त्यांना आरोपी करण्यात आले. अशा आठ गुन्ह्यांमध्ये खटल्यांना सामोरे गेल्यानंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली. चंद्रपूरमधील शेवटच्या प्रकरणात २३ सप्टेंबर २०११ रोजी निर्दोष मुक्तता झाल्यानंतर २७ सप्टेंबरला त्यांची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. मात्र, कारागृहाबाहेर पडताच साध्या वेशातील व्यक्तींनी त्यांना वाहनातून नेले. या घटनेची तक्रार त्यांच्या वकिलांनी धंतोली पोलिसांकडे केली होती.

नक्षलवाद्यांच्या चौकशीत नाव आल्याचा पोलिसांचा दावा

गडचिरोली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मे २०११ मध्ये आत्मसमर्पण केलेल्या तीन नक्षलवाद्यांच्या चौकशीत फरेरा यांचे नाव पुढे आले होते. त्यामुळे पुराडा पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांच्या तपासासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, ताब्यात घेताना अटकेची कारणे त्यांना सांगण्यात आली नाहीत. तसेच, नातेवाइकांना अटकेची माहिती दिल्याचा पुरावाही पोलिसांना सादर करता आला नाही.

अटकेच्या प्रक्रियेतील त्रुटींवर न्यायालयाचे ताशेरे

अटकेची कारणे संबंधित व्यक्तीला कळविणे आणि त्याच्या नातेवाइकांना माहिती देणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाने डी. के. बसू प्रकरणात अटकेसंदर्भात घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचेही पालन झाले नसल्याचे खंडपीठाने नमूद केले. अटक पंचनाम्यात आवश्यक नोंदी नव्हत्या. तसेच, अटकेची माहिती नातेवाइकांना दिल्याची नोंदही उपलब्ध नव्हती. पोलिसांनीच कायद्याचे उल्लंघन करणे ही गंभीर बाब असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि तपास अधिकाऱ्यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर फरेरा यांची याचिका अंशतः मंजूर करून राज्य सरकारने आठ आठवड्यांच्या आत दोन लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले. ही रक्कम न्यायालयात जमा करण्याचे निर्देशही देण्यात आले. नुकसानभरपाईची रक्कम अपुरी वाटल्यास स्वतंत्र दिवाणी दावा दाखल करण्याची मुभा याचिकाकर्त्याला देण्यात आली आहे.