नागपूर: महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे उमेदवार घोषित झालेले उद्योजक अरुण लाखानी यांनी ‘राजकारण आणि कौटुंबिक नातेसंबंध पूर्णपणे वेगळे आहेत’, असे स्पष्ट मत व्यक्त केले.
पवार कुटुंबियांशी जोडले जाणारे नाते
अरुण लाखाणी यांचे सुपुत्र सारंग यांचा विवाह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यांच्याशी येत्या २० जून रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना लाखाणी म्हणाले, भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर सुप्रियाताईंनी माझे अभिनंदन केले. पवार कुटुंब हे एक मोठे राजकीय घराणे असल्याने या संबंधांची चर्चा होणे स्वाभाविक आहे. मात्र, यात मला काहीही असामान्य वाटत नाही. दोन्ही बाजू आपापल्या विचारसरणीशी बांधील असून, राजकारण आणि कुटुंब या स्वतंत्र गोष्टी आहेत.
पक्षनेतृत्वाचे आभार आणि विजयाचा विश्वास
उद्योग जगतातून सक्रिय राजकारणात उतरलेल्या लाखाणी यांनी आपल्या उमेदवारीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. निवडणुकीतील यशाबद्दल एका वृत्तपत्राशी बोलताना ते म्हणाले की, लोकशाहीत मतदार अशाच उमेदवाराला निवडतात जो त्यांच्यासाठी काम करेल आणि शासकीय योजनांचे लाभ लोकांपर्यंत पोहोचवेल. क्रीडा क्षेत्रात प्रशासक म्हणून काम करण्याचा अनुभव असल्याने ही निवडणूक आपण निकोप आणि खिलाडूवृत्तीने लढवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मतदारसंघाच्या आव्हानांवर लाखाणींचे उत्तर
चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठा आणि वैविध्यपूर्ण आहे. यात नक्षलग्रस्त व मागास गडचिरोली आणि गांधीवादी विचारांचा वारसा असलेला वर्धा जिल्हा येतो. या आव्हानात्मक भूप्रदेशाबाबत विचारले असता लाखाणी म्हणाले, हा भाग माझ्यासाठी नवीन नाही. लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या माध्यमातून मी या तिन्ही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर काम केले असून, येथील जनतेशी माझा थेट संपर्क आहे. त्यामुळे भाजपच्या विश्वासाला सार्थ ठरवत मी ही निवडणूक नक्कीच जिंकणार.
विरोधकांचा ‘उद्योजक’ कार्डवरून भाजपवर निशाणा
दुसरीकडे, लाखाणी यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजप तळागाळातील कार्यकर्त्यांना डावलून केवळ उद्योजकांना प्राधान्य देत असल्याचा आरोप त्यांनी केला. वडेट्टीवार पुढे म्हणाले, काँग्रेसने किसान सेलचे राष्ट्रीय सचिव शैलेंद्र अग्रवाल यांना मैदानात उतरवून आपली उमेदवारी आधीच निश्चित केली होती. भाजपकडे संख्याबळ असूनही त्यांनी भीतीपोटी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची घोषणा लांबवली. दरम्यान, १८ जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीमुळे विदर्भातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
