चंद्रपूर : काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीच भाजप उमेदवारासाठी पैसे वाटप केल्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक सहलीला गेल्याचा गंभीर आरोप करीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार सुधीर कोठारी यांनीही उमेदवारी मागे घेतल्याने भाजपचे उमेदवार अरुण लखानी अविरोध विजयी झाले आहेत.
अग्रवाल उमेदवारी मागे घेणार असल्याची चर्चा बुधवारी सायंकाळपासूनच राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. वर्धा येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या घरी भेट देण्यासाठी गेलो असता ते सहलीसाठी रवाना झाल्याने त्यांची भेट होऊ शकली नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्याचवेळी मतांची जुळवाजुळव होत नसल्यामुळे अग्रवाल निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यांतील काँग्रेस नेत्यांकडूनही अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याचे चित्र होते. अखेर गुरुवारी दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास अग्रवाल जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले. विशेष म्हणजे, नामनिर्देशन मागे घेताना त्यांच्या सोबत चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचा एकही प्रमुख नेता उपस्थित नव्हता. यानंतर माध्यमांशी बोलताना अग्रवाल यांनी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवरच गंभीर आरोप केले. ‘‘काँग्रेसमधील काही नेत्यांनी भाजप उमेदवारासाठी पैसे वाटप केले. त्यामुळेच काँग्रेसचे नगरसेवक आणि मतदार पर्यटनासाठी निघून गेले,’’ असा दावा त्यांनी केला. निवडणूक प्रक्रिया आता केवळ पैशांचा बाजार बनली असून अनेक जण आर्थिक आमिषांना बळी पडत असल्याची टीकाही त्यांनी केली.
‘‘आज मतदारांना एखाद्या उमेदवाराकडून पैसे मिळत असतील आणि दुसरा उमेदवार काहीच देत नसेल, तर ते पैशांच्या आमिषाला बळी पडतात. ही लोकशाहीसाठी आणि राजकारणासाठी घातक बाब आहे. अशा गलिच्छ राजकारणाचा भाग राहायचे नसल्याने मी उमेदवारी मागे घेतली,’’ असेही अग्रवाल म्हणाले.
दिल्लीपासून मुंबईपर्यंत आणि चंद्रपूरपर्यंत निवडणुका पैशांच्या बळावर लढवल्या जात असल्याचा आरोप करत त्यांनी संपूर्ण प्रक्रिया ‘मॅनेज’ होत असल्याचा दावा केला. ‘‘सर्व काही ठरलेले असेल, तर निवडणुका घेण्याची गरज काय?’’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार सुधीर कोठारी यांनी पक्षाचे नेते सुनील तटकरे यांचा दूरध्वनी आल्यानंतर उमेदवारी मागे घेतल्याचे सांगितले.
अग्रवाल आणि कोठारी या दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे उमेदवार अरुण लखानी हे अविरोध निवडून आले. अग्रवाल यांच्या माघारीमुळे काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाचीही मोठी राजकीय कोंडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
