नागपूर : भारतीय जनता पक्ष हा लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना राबवत असल्याचा आव आणत आहे. मग एका भाजपा आमदारासह त्यांच्या कुटुंबीयांकडून मानसिक व शारीरिक छळ सहन करणारी सून प्रिया फुके ही भाजपची लाडकी बहीण नाही आहे का?, एका आमदाराचे कुटुंब खुलेआम बलात्कार आणि खून करण्याची धमकी एका विधवा सुनेला देत आहेत, अशा आमदारासह कुटुंबीयांविरुद्ध कारवाई करण्याऐवजी पोलीससुद्धा त्यांच्याच पंगतीला बसत आहेत, असा आरोप माहेर सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्ष अरुणा सबाने यांनी केला आहे. त्या सोमवारी प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेत बोलत होत्या.

अरुणा सबाने म्हणाल्या, की शहरातील रमेश फुके आणि त्याचा आमदार मुलगा परिणय फुके यांनी भाऊ संकेत फुकेला गंभीर आजार असल्याचे लपवून प्रियाशी लग्न लावले. संकेतच्या निधनानंतर फुके कुटुंबियांनी प्रियाला घराबाहेरसुद्धा जाण्यास मनाई केली. त्यांनी प्रियाकडून एटीएम, बँकेचे पासबुक, दागिने जबरदस्तीने काढून घेतले. युनियन बँकेच्या धरमपेठ शाखेच्या खात्यात चार कोटी रुपये होते. मात्र, त्यातील ३.३० कोटी रुपये बनावट स्वाक्षरी करत रमेश फुके यांच्या खात्यात वळते केले असा आरोप सबाने यांनी केला. याबाबत तक्रार केल्यानंतर “आमचे कुटुंब सधन असून आम्ही राजकीय दबावाने काहीही करू शकतो. तू शांत राहिली नाहीस तर तुझ्या आई आणि बहिणीवर अत्याचार करण्यात “येईल, अशी धमकी प्रियाला सासऱ्यांनी दिली, असा दावा सबाने यांनी केला.

हेही वाचा…Video : उद्धव ठाकरे यांची बॅग तपासल्यावरून वणीत वातावरण तापले

संकेतच्या निधनानंतर प्रियाला रात्री ११ वाजता दोन्ही मुलांसह घरातून बाहेर काढले. फुके कुटुंब बाहेर समाजसेवेचे ढोंग करतात आणि घरातील सुनेशी एवढी क्रूर वागणूक देतात. प्रिया आता आईच्या पेंशनवर जगत आहे. मुलांचे शैक्षणिक शुल्क भरायलासुद्धा फुके कुटुंब आर्थिक मदत करीत नाहीत. संकेतचे ‘अताशा आशीर्वाद बिल्डर्स’मध्ये ४० टक्के शेअर्स परस्पर सासू-सासऱ्यांच्या नावाने करून घेतले. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आमदार परिणय फुकेसह कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, राजकीय दबावामुळे या प्रकरणाचा तपास पुढे सरकत नाही. अंबाझरीचे ठाणेदार विनायक गोल्हे हे फिर्यादी प्रिया यांनाच पुरावे आणि घटनेचे साक्षीदार आणण्यासाठी दबाब टाकत आहेत, असा आरोप अरुणा सबाने यांनी केला. यावेळी माहेर संस्थेच्या सचिव प्रज्वला तट्टे, सदस्या करुणा शिंदे, सुजाता लोखंडे यांच्यासह आमदार फुके यांच्या प्रिया फुके उपस्थित होत्या.

हेही वाचा…भाजपच्या जाहिरातीत सर्व जातींच्या टोप्या…एक टोपी मात्र मुद्दाम…

अंबाझरी पोलिसांचाही त्रास – प्रिया फुके

फुके कुटुंबीयांनी बलात्कार आणि खून करण्याची धमकी दिल्यानंतर अंबाझरी पोलीस तक्रार घेण्यास तयार नव्हते. फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठा मलाच पुरावे मागतात. स्वत:च्या नावे असलेल्या सदनिकेत राहायला जायचे असल्यामुळे माझ्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली. माझ्या मुलांच्या हक्कासाठी मी उभी आहे. मला फुके कुटुंबीय वारंवार धमक्या देऊन आणि पाठलाग करुन त्रस्त करीत असल्याचा आरोप प्रिया फुके यांनी पत्रपरिषदेत लावला आहे.

Story img Loader