गडचिरोली : घरात वडिलांची आठवणही धूसर असतानाच आयुष्याने तिच्यासमोर संघर्ष उभा केला. वयाच्या अवघ्या चार महिन्यांची असताना वडील घर सोडून नक्षलवादी चळवळीत गेले. त्यानंतर आईने विविध कामे करत मुलीला वाढवले. घरावर नक्षलवादाचे सावट असतानाही अरविंदा बारसागडे हिने मात्र शिक्षणाची वाट सोडली नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिने सिव्हिल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. आता लॉयड्स मेटल्स अँड एनर्जीच्या हेडरी येथील एलटी गोंडवाना स्किल हबमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत असलेली अरविंदा पुढे बी.टेक. करण्याचे स्वप्न पाहत आहे.
अरविंदाचे वडील राजाबाबू ऊर्फ किरण ऊर्फ समय्या हे सुरुवातीला नारायणपूर ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत होते. मात्र ग्रामस्थांकडून त्यांची घरपट्टीच्या अतिरिक्त वसुलीबाबत नक्षलवाद्यांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर सार्वजनिकरीत्या झालेल्या अवहेलनेमुळे त्यांनी २००५ मध्ये सिरोंचा दलममध्ये प्रवेश केला. त्या वेळी अरविंदा अवघी चार महिन्यांची होती. वडिलांच्या या निर्णयामुळे तिच्या बालपणावर नक्षलवादाच्या दहशतीची सावली पडली.
छोटी-मोठी कामे करून मुलीचा सांभाळ
पती नक्षलवादी चळवळीत गेल्यानंतर अरविंदाची आई लता यांनीही काही काळ सिरोंचा येथे नोकरी केली. मात्र पतीच्या पार्श्वभूमीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे परिणाम त्यांना भोगावे लागले आणि त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर मिळेल ती छोटी-मोठी कामे करून मुलीचा सांभाळ केला. मुलीच्या शिक्षणासाठी परिस्थितीशी झगडणाऱ्या आईच्या कष्टांची जाणीव अरविंदाला होती.
तांत्रिक शिक्षणाची वाट निवडली
२०१० मध्ये राजाबाबूंनी नक्षलवादी चळवळीचा मार्ग सोडून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर कुटुंब गडचिरोलीत स्थलांतरित झाले. अरविंदानेही नव्या वातावरणात आपले शिक्षण सुरू ठेवले. गडचिरोली शहरात शिकताना तिने दहावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अकरावी-बारावी कला शाखेतून पूर्ण केली. सुरुवातीला वकिली तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करण्याची तिची इच्छा होती. मात्र पुढे तिने तांत्रिक शिक्षणाची वाट निवडली. गडचिरोलीच्या शासकीय तंत्रनिकेतनातून तिने सिव्हिल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. २०२५ मध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तिने रोजगाराच्या दिशेने पाऊल टाकले. सध्या ती हेडरी येथील एलटी गोंडवाना स्किल हबमध्ये प्रशिक्षण घेत आहे.
नव्या पिढीच्या आकांक्षांचे प्रतीक
नक्षलवादाच्या सावटाखाली सुरू झालेले बालपण आणि शिक्षणाच्या प्रकाशात घडत गेलेले भविष्य, हा अरविंदाचा प्रवास अनेक अर्थांनी वेगळा आहे. ज्या कुटुंबाने संघर्षाचा काळ जवळून पाहिला, त्याच कुटुंबातील मुलीने शिक्षण आणि कौशल्याच्या जोरावर स्वतःसाठी नवी ओळख निर्माण केली आहे. आता बी.टेक.चे शिक्षण पूर्ण करून अभियांत्रिकी क्षेत्रात पुढे जाण्याचे तिचे स्वप्न आहे. तिची ही वाटचाल केवळ एका मुलीच्या जिद्दीची कहाणी नाही, तर बदलाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या गडचिरोलीतील नव्या पिढीच्या आकांक्षांचेही प्रतीक आहे.
