अकोला : वृक्षारोपण व त्याच्या संवर्धनाचे महत्त्व ओळखून अंदमान ॲण्ड निकोबार येथील ध्येयवेडे ए.एस. नाथन महाराष्ट्रात झटत आहेत. वृक्षमित्र समाजसेवी नाथन यांनी गत ११ वर्षांत अकोला जिल्ह्यात वृक्षरोपणाची प्रभावी मोहीम राबवली. ‘एक जन्म, एक वृक्ष’, ‘एक विद्यार्थी, एक वृक्ष’, ‘एक दाखला, एक वृक्ष’, स्वस्तिक पॅटर्न आदी विविध मोहीम राबवून त्यांनी लाखो वृक्षारोपण केले. वृक्षारोपण व संवर्धनाच्या ‘नाथ’ पॅटर्नची राज्यभरात इतरही ठिकाणी अंमलबजावणी केली जात आहे.

पर्यावरणासाठी जीवन वाहून घेतले

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सर्वस्तरावर त्यासाठी व्यापक प्रयत्न होत आहेत. मात्र, अपेक्षित यश मिळालेले नाही. राज्यात वन विभाग दरवर्षी वृक्षारोपण करते. त्यामध्ये कोट्यवधींच्या संख्येने वृक्षारोपण होत असले तरी त्याच्या संवर्धनाबाबत प्रचंड उदासीनता आहे. आजही वृक्षाने व्यापलेल्या क्षेत्रात झपाट्याने घट होत आहे. याच पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धानासाठी ए.एस. नाथन यांनी आपले जीवन वाहून घेतले. भारत वृक्ष क्रांती मिशनचे प्रणेते ए.एस. नाथन यांनी वृक्षारोपणाचे प्रभावी कार्य केले.

सहायक दिग्दर्शक ते वृक्षमित्र; डॉ. भटकरांच्या सल्ल्याने अकोला कर्मभूमी 

नाथन दक्षिणात्य चित्रपट सृष्टीत सहायक दिग्दर्शक म्हणून कार्यरत होते. आपल्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे स्थिरावल्यावरही त्यांनी पर्यावरणासाठी प्रत्यक्ष कार्य करण्याचा निर्धार त्यांनी केला. दरम्यान, २७ फेब्रुवारी २०१५ ला नाथन यांची नागपूर येथे ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ.विजय भटकर यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली. डॉ.भटकरांनी नाथन यांना प्रत्यक्षात कृती करण्याचा सल्ला दिला. वृक्षारोपणाचे कार्य अकोला जिल्ह्यात करण्याचेही त्यांनी सूचवले. त्यानुसार नाथन अकोला जिल्ह्यात आले व त्यांनी २०१५ पासून वृक्षरोपण व संवर्धनाचे कार्य सुरू केले.

विविध उपक्रमांमधून लाखो वृक्षारोपण

वृक्षारोपण मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप आल्याशिवाय ती यशस्वी होऊ शकत नाही, हे नाथन यांनी जाणले व त्याची जनजागृती केली. प्रत्यक्ष गावात, शहरांमध्ये जाऊन त्यांनी वृक्षारोपणाला प्रोत्साहित केले. शाळा, महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी सातत्याने जनजागृती केली. पर्यावरणासाठी रात्रंदिवस झटून नाथन यांनी प्रत्यक्ष कृतीतून वृक्षारोपण व संवर्धनाचा संदेश दिला. वृक्षारोपण मोठ्या हिरहिरीने होत असले तरी त्याच्या संवर्धनाकडे नागरिकांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे नादन यांनी ‘एक जन्म, एक वृक्ष’च्या माध्यमातून समाजाला वृक्षारोपणाचे महत्त्वप पटवून दिले. ‘एक विद्यार्थी, एक वृक्ष’, ‘एक दाखला, एक वृक्ष’ या मोहीम सुद्धा त्यांनी प्रभावीपणे राबवल्या आहेत. या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण झाले.

‘स्वस्तिक’ पॅटर्नची संकल्पना मोकळ्या शासकीय जागेत विविध उपयुक्त वृक्ष स्वस्तिकच्या आकारात लावण्याची मोहीम त्यांनी सुरू केली. १०० फूट लांब व १०० फूट रुंद स्वस्तिक पॅटर्न वृक्षलागवडीच्या माध्यमातून एकाचवेळी एक हजार वृक्षाची लागवड करता येते. यामध्ये विविध २५ प्रकारच्या वृक्ष प्रजातीच्या माध्यमातून ऑक्सिजन मिळण्यासह सौंदर्यीकरणाची ए.एस. नाथन यांची संकल्पना यशस्वी ठरली. अकोला जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणी स्वस्तिक पॅटर्ननुसार वृक्षलागवड केली आहे. जिल्हा प्रशासनाकडून त्याची विशेष मोहीम देखील राबवली जात आहे.