मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील जिल्हा परिषद शाळेची अवस्था प्रचंड दयनीय झाली आहे. पावसामुळे वर्गखोल्यांना गळती लागली आहे. विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून येथे शिक्षण घ्यावे लागत असल्याने संतप्त झालेल्या पालकांनी पाल्यांसह चक्क मालेगाव पंचायत समितीच्या सभागृहातच शाळा भरविली.

हेही वाचा >>> चंद्रपूर : बिबट्या कोंबड्यांची शिकार करायला गेला अन् खुराड्यात अडकला; वनविभागाच्या पथकाने केले जेरबंद

एकीकडे लाखो रुपये खर्च करून जिल्हा परिषदेला ‘कॉर्पोरेट लुक’ देण्यात आला आहे. येथील शिक्षण विभागाचेही रूपडे पालटले आहे. परंतु जिल्हा परिषद शाळेत सोई-सुविधांची वानवा कायम आहे. मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील जिल्हा परिषदेची शाळा मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणात अनेक अडथळे येत आहेत. पाऊस आल्यानंतर वर्गखोल्यांत पाणी साचते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही शाळा इमारतीची डागडुजी करण्यात आली नाही. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज, बुधवारी (दि.१४ सप्टेंबर) मालेगाव येथील पंचायत समिती कार्यालयात शाळा भरवली. जोपर्यंत शाळा इमारतीची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत पाल्यांना शाळेत पाठवणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेतली.