नागपूर : राज्यातील काही भागात तापमान वाढू लागल्याने वातानुकूलित यंत्र, पंखे, कुलरसह कृषीपंपाचा वापर वाढू लागला आहे. त्यामुळे राज्यातील विजेची मागणी वाढून गुरुवारी (२२ फेब्रुवारी) दुपारी २.२० वाजता २६ हजार ७ मेगावाॅटवर पोहोचली आहे. त्यापैकी २१ हजार ४५३ मेगावाॅट मागणी महावितरणची आहे.

राज्यात गेल्या महिन्यात तापमान कमी असल्याने विजेची मागणी २५ हजार मेगावाॅटच्या जवळपास होती. त्यात महावितरणच्या २० हजार मेगावाॅट मागणीचा समावेश होता. परंतु, राज्यातील काही भागात आता हळूहळू तापनान वाढत आहे. त्यामुळे विदर्भासह राज्यातील काही भागात एकीकडे वातानुकूलित यंत्र, पंखे यासह विद्युत उपकरणे, कृषीपंपासह कुलरही सुरू होऊ लागले आहे. त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. गुरुवारी (२२ फेब्रुवारी) दुपारी २.२० वाजता राज्यात विजेची मागणी २६ हजार ७ मेगावाॅट होती. त्यापैकी २ हजार ८९५ मेगावाॅट विजेची मागणी मुंबईची तर २१ हजार ४५३ मेगावाॅट विजेची मागणी महावितरणची होती.

हेही वाचा – वनखात्यातील वनरक्षक भरतीप्रक्रिया; शारीरिक चाचणीत अव्यवस्थेचा आरोप

सर्वाधिक वीजनिर्मिती महानिर्मितीकडून

राज्यात बुधवारी दुपारी २.२० वाजता ६ हजार ३३३ मेगावाॅट वीजनिर्मिती महानिर्मितीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पातून होत होती. महानिर्मितीच्या उरन गॅस प्रकल्पातून २७८ मेगावाॅट, जलविद्युतमधून ७७ मेगावाॅट, सौरऊर्जामधून ८७ मेगावाॅट वीजनिर्मिती होत होती. तर खासगी प्रकल्पांपैकी जिंदलमधून ८६० मेगावाॅट, अदानी १,८२० मेगावाॅट, आयडियल १५३ मेगावाॅट, रतन इंडिया १,३०४ मेगावाॅट, एसडब्लूपीजीएलमधून ४५९ मेगावाॅट वीजनिर्मिती होत होती. तर केंद्राच्या वाट्यातून राज्याला ८,४२१ मेगावाॅट वीज मिळत होती.

हेही वाचा – ..अन् मनोहर जोशींचे विरोधी पक्षनेते पद गेले, काय घडले होते नागपूर अधिवेशनात ?

राज्यात तापमानवाढीमुळे विजेची मागणी वाढत असली तरी महावितरणने आवश्यक नियोजन केल्याने सर्वत्र वीजपुरवठा सुरळीत आहे. – भारत पवार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई.