वर्धा : दरिद्रिनारायानासाठी लढा देणाऱ्या गांधीजींच्या सेवाग्राम आश्रम परिसरातच ही खळबळजनक घटना घडली. येथील आदर्श नगरात साहेबराव भस्मे हे पत्नी, मुलगा प्रशांत व मुलगी प्रणितासह राहतात. प्रणिता ही मानसिक रुग्ण असल्याने तिला वारंवार रुग्णालयात नेल्या जात असे. काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती खूप बिघडल्याने तिच्यावर उपचार झाले. नंतर घरी आणले. ४ जुलैला परत प्रकृती बिघडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. परिस्थिती बेताचीच असल्याने कुटुंबाने अंत्यसंस्कार न करता घरीच तिचा मृतदेह जमिनीत पुरण्याचा निर्णय घेतला. सर्वांनी मिळून घरातच खड्डा केला व मृतदेह टाकून तो मातीने बुजविला. शेजारच्या लोकांना प्रणिता आठ दिवसांपासून घरी न दिसल्याने त्यांचा संशय बळावला. त्यामुळे ही घटना उजेडात आली. पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी हे घर गाठले. विचारपूस केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हेही वाचा - वनसंवर्धन विधेयकाला निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचा विरोध; संसदेत विरोध करण्यासाठी खासदारांना पत्र हेही वाचा - गजानन महाराजांची पालखी विदर्भाच्या उंबरठ्यावर! सिंदखेड राजात रविवारी होणार दाखल; २४ ला शेगावात पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी न्याय दंडाधिकारी आवश्यक म्हणून तहसीलदार रमेश कोळपे, नायब तहसीलदार बाळू भागवत, सेवाग्रामचे ठाणेदार चकाते घटनास्थळी पोहोचले. मृतदेह पूर्ण कुजलेला असल्याने सेवाग्राम रुग्णालयाची फॉरेन्सिक चमू बोलाविण्यात आली. डॉ. प्रवीण झोपाटे व चमूने सोपस्कार पार पाडले. पंचनामा व शवविच्छेदन पोलीस व तहसीलदार यांच्या उपस्थितीत घटनास्थळीच करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पोलीस कारवाई सुरू होती.