नागपूर : मंगेशकर घराणे आणि शेवाळकर कुटूंब यांचा जवळजवळ चार दशकांचा कौटुंबिक बंध. साधारण ८८-८९ सालच्या सुमारास बाबा (वक्तादशसहस्त्रेषू राम शेवाळकर) आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर ‘अमृताचा धणू’ नावाचा कार्यक्रम करायचे. या कार्यक्रमापासुन सुरू झालेल प्रवास कौटूंबिक धाग्यात अगदी घट्ट बांधला गेला. हृदयनाथानंतर लता दीदी आणि मग आशाताई आमच्या कुटूंबाचा भाग झाले. त्यातही आशाताईंशी आम्हा सर्वांचे सूर जरा अधिकच जुळले.

आशुतोष शेवाळकर म्हणाले..

मला अजूनही आठवतंय, जेव्हाजेव्हा आशाताई नागपुरात आल्या. तेव्हातेव्हा त्या घरी सर्वांना भेटल्याशिवाय कधी गेल्या नाहीत. त्या आल्या की रात्रभर गप्पांची आणि त्यातच मग गाण्यांचीमैफंल रंगायची. यातच पहाट कधी व्हायची ते कळायचे नाही. मंगेशकर कुटूंबातील कुणीही घरी आलं तर कधीच काही वाटायचं नाही, पण आशाताई येणार म्हटलं की आम्ही सारेच तणावात असायचो.

हा तणाव भीतीयुक्त नाही तर आदरयुक्त होता. त्यामागचे कारणही तसेच होते. आशाताई आणि स्वच्छता व नीटनेटकेपणा हे म्हणजे समीकरण. त्यामुळे त्या येणार म्हटले की अवघे घर कामाला लागायचे. अगदी घरातल्या नोकरांपासून तर आम्ही सारेच घराचा कानाकोपरा स्वच्छ करण्यासाठी कामाला लागायचो. तरीही एखाद्या कोपऱ्यावर धूळ दिसलीच तर स्वत: हातात कापड घेऊन पुसून काढायच्या. अगदी स्वच्छतागृहात एखादा डाग दिसला तरीही स्वत: त्या हातात ब्रश घेऊन स्वच्छ करायच्या.

एवढ कोण करतं?

त्यांनी कधीच मोठेपणाचा बडेजाव आणला नाही, मिरवला नाही. खाण्याची आणि इतरांना करुन खाऊ घालण्याची प्रचंड आवड असणाऱ्या आशाताई घरी आल्यानंतर एखाद्या पदार्थांचा विषय निघाला नाही असे कधी झालेच नाही. मग त्या पदार्थाची कृती आमच्याकडे प्रत्यक्षात व्हायची आणि आम्हालाही आशाताईंच्या हातचे पदार्थ चाखायला मिळायचे.

मुक्कामी नसल्या तरी रात्री आल्यानंतर रंगलेल्या गप्पांच्या मैफलीत पहाट कधी व्हायची ते कळायचेच नाही. या गप्पांच्या मैफलीत मग आशाताईंचे सूर देखील लागायचे आणि मग ती पहाट रंगत जायची. आमच्या ‘पर्णकुटी’समोर एक पानठेलेवाला होता. तो कधी करंजी तर कधी समोसा अशा वेगवेगळ्या पदार्थंच्या आकाराचे पान तयार करायचा. मग ती पानांची थाळी आशाताई आल्या की त्यांच्यासमोर अशी ठेवली जायची.

आशाताई नावाच्या व्यक्तीमत्त्वात ‘अहंकार’ आम्ही कधी पाहिलाच नाही. इतका त्यांच्या स्वभावात मोकळेपणा होता. अगदी आमच्या घरातल्या नोकरचाकरांशी सुद्धा त्या हसतखेळत, मिळूनमिसळून वागत. बाबांना त्या ‘रामभाऊ’ या नावानेच हाक मारायच्या. डोंबिवलीला जेव्हा बाबांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तो सन्मान देखील आशाताईंच्या हस्ते झाला. तर बाबांचा अमृतमहोत्सवी सत्कार लता दीदींच्या हस्ते झाला.

‘अमृताचा धनू’ तून जुळले ऋणानुबंध

बाबा आणि हृदयनाथ मंगेशकर ‘अमृताचा धनू’ नावाचा कार्यक्रम करायचे. या कार्यक्रमात बाबा निरुपण करायचे तर हृदयनाथ गाणी गायचे. नंतर मग याच कार्यक्रमातून ‘कानडाऊ विठ्ठलू’ नावाचा एक संगीत अल्बम निघाला. यातही बाबांचे निरुपण आणि गाणी लतादीदी व आशाताईंची आहेत. अगदी आतापर्यंत जेव्हाकेव्हा आशाताई घरी आल्या तेव्हा कोणतातरी विषय निघाला आणि गाणे झाले नाही, असे कधीच झाले नाही.

त्यामुळे कालपरवापर्यंत ठणठणीत असणाऱ्या आशाताई आता पुन्हा आपल्याकडे येणार नाहीत, हे मन मानायलाच तयार नाही. येत्या १६ तारखेला लता मंगेशकर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सचे उद्घाटन ठरले होते आणि त्या कार्यक्रमात आशाताई उपस्थित राहणार होत्या. तर २४ तारखेला दिवंगत दीनानाथ मंगेशकरांच्या कार्यक्रमातही त्या जाणार होत्या. मात्र, तत्पूर्वीच त्यांनी अकाली ‘एक्झीट’ घेतली. कुणालाही त्रास न देता आणि स्वत:लाही त्रास करुन न घेता आणि मागे आठवणींची मैफल सोडून गेल्या.