अकोला : भोंदूबाबा अशोक खरात याचे दीपक केसरकर, रुपाली चाकणकर हे पार्टनर असतील. आपल्या आजूबाजूच्या लोकांना ते त्याच्याकडे घेऊन जात होते, असा गंभीर आरोप राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी केला आहे. महिला आयोगाने पाच वर्षांत काहीच केले नाही, अशी टीका सुद्धा त्यांनी केली. 

गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात अटकेत असून त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात विविध धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या डॉ. आशा मिरगे यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर याचा खरपूस समाचार घेतला. दीपक केसरकर यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले. 

*पहिल्या क्रमांकावर केसरकर, तर दुसऱ्या क्रमांकावर चाकणकर*

डॉ. आशा मिरगे म्हणाल्या, ‘‘काही लोक अशोक खरात याचे पार्टनर असतील. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर दीपक केसरकर, तर दुसऱ्या क्रमांकावर रुपाली चाकणकर आहेत. आपल्या आजूबाजूच्या लोकांना आवर्जून भोंदूबाबापर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले. असंख्य महिलांनी त्यांनी नेले. महिला संकटनांची बैठक असतांना हा भोंदूबाबा त्या ठिकाणी जात होता.’’

‘तो बाबा नजरेने रुपालीताईंना खात होता’

रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगात सुद्धा राजकारणच केले. समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या केक भरवतांनाच्या छायाचित्रात भोंदूबाबाची अत्यंत वाईट नजर दिसून येते. तो नजरेने खात आहे रुपालीताईंना, हे त्यांना दिसले किंवा कळले नाही? मग दोनपैकी एक आहे, त्या मठ्ठ बुद्धी आहे की त्यांना समोरचे काही कळले नाही किंवा या त्याच्या पार्टनर असून या सगळ्या गोंष्टीमध्ये त्याला मदत करणाऱ्या आहेत, असा आरोपही डॉ.मिरगे यांनी केला.

*खरातकडे जाणाऱ्यांमध्ये तीन प्रकारचे लोक*

भोंदूबाबा अशोक खरातकडे जाणाऱ्यांमध्ये तीन प्रकारचे लोक आहेत. एक फक्त भेट देणारे. ते फक्त भेटले. त्यांना एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही माहिती नसते. काही समर्थक असतात. अधिकारी, अंतर्गत मित्र असे ते समर्थक असतात. काही लोक त्यांचे पार्टनर असतील. ते इतर आजूबाजूच्या लोकांना त्या बाबाकडे घेऊन जात होते, असे डॉ. आशा मिरगे म्हणाल्या.