अकोला : महिला संघटनांच्या विविध बैठकांना रुपाली चाकणकर अशोक खरातला घेऊन जात होत्या. महिलांपुढे त्या अशोक खरातला ‘प्रोमोट’ करीत होत्या, असा गंभीर आरोप राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉ. आशा मिरगे यांनी केला.
गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकमध्ये कॅप्टन अशोक खरातला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात विविध धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या डॉ. आशा मिरगे यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला.
रुपाली चाकणकर खरातला गुरू संबोधायच्या
डॉ. आशा मिरगे म्हणाल्या, आपल्या आजूबाजूच्या महिलांना भोंदूबाबापर्यंत नेण्याचे काम रुपाली चाकणकर यांनी केले. प्रत्येक महिलेला त्यांनीच नेले, असे मी म्हणणार नाही. पण अनेक महिलांना त्यांनीच नेले. महिला संकटनांची बैठक असतांना हा भोंदूबाबा त्या ठिकाणी जात होता. त्या बैठकांमध्ये जाहीरपणे रुपाली चाकणकर त्या भोंदूबाबाला गुरू म्हणून संबोधन होत्या.
आज मी ज्या ठिकाणी आहे, ती यांच्यामुळे पोहचली आहे. हे माझे पांडुरंग आहेत, अशा प्रकाराचे वक्तव्य करीत होत्या. प्रत्येक महिलेला त्यांच्यासारखे पद, व्यक्तिमत्त्व व गॅल्मर मिळावं, असं वाटतं होतं. रुपाली चाकणकर त्या महिलांमध्ये बाबाला ‘प्रोमोट’ करीत होत्या.
आयोगातही राजकारणच; मठ्ठ बुद्धी की पार्टनर?
रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगात सुद्धा राजकारणच केले. आयएएस असणाऱ्या सदस्य सचिव महिला अधिकाऱ्यांना देखील त्यांनी कधी महत्त्व दिले नाही, असा आरोपही डॉ. मिरगे यांनी केला.
समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या केक भरवतांनाच्या छायाचित्रात भोंदूबाबाची अत्यंत वाईट नजर दिसून येते. यांना कळले नाही? दोनपैकी एक आहे. त्या मठ्ठ बुद्धी आहे की त्यांना समोरचे काही कळले नाही किंवा या त्याच्या पार्टनर असून या सगळ्या गोंष्टीमध्ये त्याला मदत करणाऱ्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
महिला व बालकल्याण की लाडकी बहीण योजना मंत्री?
राज्यात नाशिक येथील प्रकरण चांगलेच गाजत आहे. मात्र, त्यावर व्यक्त होतांना महिला व बालकल्याण मंत्री कुठेही दिसल्या नाहीत. त्या महिला व बालकल्याण मंत्री आहेत की फक्त लाडकी बहीण योजना मंत्री आहेत, अशी टीका डॉ. आशा मिरगे यांनी केली.
