अमरावती : आषाढी एकादशीनिमित्त रविवारी श्री क्षेत्र कौंडण्यपूरसह जिल्ह्यातील प्रत्येक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली. दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून भक्तांच्या रांगा लागल्या. सर्वत्र जय हरी विठ्ठलाचा गजर सुरू होता. आषाढी एकादशीनिमित्त कौंडण्यपूरच्या श्री विठ्ठल-रूक्मिणी संस्थानमध्ये महापूजेचे आयोजन करण्यात आले. महाअभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर भजन-कीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रम सुरू झाले.

वऱ्हा, कुऱ्हा, मार्डा, अंजनवती, मसदी, चेनुष्ठा, बोर्डा, हसनापूर, भिवापूर, वीरगव्हाण, मार्डी, शेंदुरजना खुर्द, अहिरवाडा, टाकरखेड, नांदपूर, देऊरवाडा, वाठोडा खुर्द आदी गावांतील भजन-कीर्तन मंडळांनी आपापले सादरीकरण केले. भाविक भक्तांना फराळाचा महाप्रसाद वितरित करण्यात आला. आषाढी एकादशीचे हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीला विठुरायासह भगवान विष्णूचीही पूजा केली जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी या नावानेदेखील ओळखले जाते. भागवत सांप्रदायांसाठी हा दिवस विशेष मानला जातो. अनेक भक्तांनी मंदिराजवळून वाहणाऱ्या वर्धा नदीत स्नान करून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.

रुक्मिणी मातेचे माहेर अशी कौंडण्यपूरची ओळख आहे. कृष्ण-रुक्मिणी, शिशुपाल, नल-दमयंती यांचा संबंध कौंडण्यपूरशी असल्याचे अनेक कथा सांगतात. तसेच हे स्थळ प्राचीन विदर्भाची राजधानी असल्याचे ज्ञात होते. वर्धा नदीच्या काठी असलेल्या या गावात अनेक सुंदर आणि आकर्षक मंदिरे आहेत. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर या ठिकाणी आहे. रुक्मिणी मातेची पालखी पंढरपूरला घेऊन जाण्याची प्रथा सुरू करणारे सदाराम महाराज यांची समाधी देखील याच मंदिरात आहे. या मंदिरात प्रवेश करताच पंढरपूरला आल्यासारखे भक्तांना वाटते. म्हणून या ठिकाणाला प्रति पंढरपूर म्हटले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुख्मिणीची पालखी दरवर्षी आषाढी एकादशी साठी पंढरपूरला पायदळ जात असते यावर्षी येथील देखील विठ्ठल रुख्मिणी संस्थांची पालखी घेऊन वारकरी पंढरपूरला गेले आहेत. ही पालखी गेल्या महिन्यात १ जून रोजी पंढरपूरकडे रवाना झाली. ४३१ वर्षांपासून अखंडित परंपरा असलेली ही विदर्भातील एकमेव पालखी आहे. दिंडीची सुरूवात संत सदाराम महाराज यांनी सन १५९४ मध्ये केली. दिंडीचे हे ४३१ वे वर्ष आहे. ही दिंडी कौंडण्यपुरातून हरीनामाचा गजर करीत भजन, गायन करीत अमरावती, वाशीम, हिंगोली, परभणी, बीड, धाराशीव या जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत सोलापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र पंढरपूर येथे ३३ दिवसांचा प्रवास करून पोहचते. ३ जुलै रोजी ही दिंडी पंढरपूर येथे पोहचली.