अमरावती: आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वेने मिरज ते नवी अमरावती ही विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वेची एकच फेरी होणार असून पंढरपूरहून आपल्या गावी परतण्यासाठी विदर्भातील भाविकांना ही रेल्वे उपयोगाची ठरणार आहे.
विशेष रेल्वेचे महत्व काय?
विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर परत येताना वारकरी, भाविकांची फारच गर्दी असते. अगदी आरक्षण असलेल्या डब्यांमध्येही बर्थ आरक्षित केलेल्यांना सुलभरित्या प्रवास करता येत नाही. कारण, अमरावतीला थेट परत येण्यासाठी दुसरी रेल्वेगाडी उपलब्ध नव्हती. ही बाब लक्षात घेत मध्य रेल्वेने मिरज ते नवी अमरावती ही विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला.
नवी अमरावती विशेष रेल्वे केव्हा?
ही विशेष रेल्वे २६ जुलै २०२६ रोजी मिरज येथून दुपारी चार वाजता प्रस्थान करणार असून २७ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.५० वाजता नवी अमरावती येथे आगमन होणार आहे. आरग, सलगरे, कवठेमहांकाळ, ढाळगाव, जत रोड, म्हसबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर आणि बडनेरा, हे महत्वाचे थांबे आहेत.
डब्यांची रचना कशी राहील?
मध्य रेल्वे भाविक व प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मिरज-नवी अमरावती दरम्यान एकेरी विशेष गाडी (क्र. ०१४५३) चालविणार आहे. या विशेष गाडीमध्ये एकूण १८ डबे राहणार असून त्यात द्वितीय वातानुकूलित एक डबा, तृतीय वातानुकूलित ३ डबे, शयनयान श्रेणीचे ८ डबे आणि साधारण ४ डबे राहणार आहेत. ब्रेक व्हॅन आणि दिव्यांगजनांसाठी २ डबे आहेत.
मिरज ते नागपूर ही आणखी एक गाडी
२६ जुलैला पंढरपूरहून अमरावतीला परतण्यासाठी आता दोन विशेष रेल्वे उपलब्ध आहेत. गाडी क्रमांक ०१४५१ मिरज नागपूर एकेरी विशेष गाडी २६ जुलै रोजी दुपारी १२.५५ वाजता मिरज रेल्वे स्थानकावरून सुटेल. ही गाडी पंढरपूर, कुर्डूवाडी, दौंड, अहिल्यानगर, मनमाड, जळगाव, अकोला मार्गे नागपूर येथे दुसऱ्या दिवशी पोहचेल. त्यामुळे ज्यांना २५ जुलैला निघणाऱ्या ट्रेनचे आरक्षण मिळाले नसेल त्या भाविकांना परत येण्यासाठी या दोन्ही विशेष रेल्वेचा अतिरिक्त पर्याय उपलब्ध झाला आहे.
