यवतमाळ : महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा असलेली आषाढी वारी उत्साहात सुरू झाली असून, विठू माऊलीच्या दर्शनाच्या ओढीने सर्वच प्रांतातून दिंड्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहेत.
टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ च्या जयघोषाने अवघा महाराष्ट्र दुमदुमून गेला आहे. या अथांग भक्तीसागरात सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने यंदा एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वारीदरम्यान वारकऱ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आणि संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘आशा’ स्वयंसेविकांमार्फत राज्यभर व्यापक आरोग्य जनजागृती मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बदलते हवामान आणि आरोग्याचे आव्हान
पंढरपूर आषाढी वारी हा धार्मिक सोहळा नसून तो महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा मुख्य गाभा आहे. या सोहळ्यात लाखो भाविक शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करत असतात. वारीच्या काळातील प्रचंड गर्दी, पायी प्रवास, बदलते हवामान आणि पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता, संसर्गजन्य आजारांचा संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेच आव्हान लक्षात घेऊन वारकऱ्यांमध्ये वेळेत आरोग्यविषयक जागृती निर्माण करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने विशेष खबरदारी घेत या मोहिमेचे आयोजन केले आहे.
‘आशा’ स्वयंसेविकांवर जबाबदारी
ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचा मुख्य कणा असलेल्या आशा स्वयंसेविकांवर यंदा वारीच्या आरोग्य रक्षणाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. गावपातळीवर थेट जनतेशी संवाद असणाऱ्या आशा स्वयंसेविका आता विशेष बैठका, घरभेटी, समूह संवाद तसेच माहिती, शिक्षण आणि संवादाच्या साहित्याचा प्रभावी वापर करून वारकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करत आहेत. दिंडीत निघण्यापूर्वी आणि प्रवासादरम्यान वारकऱ्यांना आरोग्याचे धडे दिले जात आहेत.
वारकऱ्यांसाठी आरोग्य मार्गदर्शक सूचना
आशा स्वयंसेविकांमार्फत वारकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना महत्त्वाच्या आरोग्य विषयक बाबींवर विशेष मार्गदर्शन केले जात आहे. दूषित पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी केवळ सुरक्षित आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा वापर, जेवणापूर्वी आणि शौचानंतर हात स्वच्छ धुण्याची सवय, वैयक्तिक व परिसराच्या स्वच्छतेची काटेकोर काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. पायी प्रवास करताना शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून निर्जलीकरण, उष्माघात आणि अतिसारापासून स्वतःचा बचाव कसा करावा, याचे तंत्र समजावले जात आहे. वारकऱ्यांनी आपल्यासोबत नियमित सुरू असलेली औषधे आणि वैयक्तिक आरोग्याचे प्राथमिक साहित्य सोबत ठेवावे तसेच प्रवासात संसर्गजन्य आजाराची कोणतीही लक्षणे दिसल्यास, ती अंगावर न काढता तत्काळ वारीत उपलब्ध असलेल्या शासकीय आरोग्य शिबिरांशी किंवा आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा, असे वारकऱ्यांना पटवून दिले जात आहे.
संवेदनशील गटांची विशेष काळजी घेणार
या जनजागृती मोहिमेत सर्वसामान्य वारकऱ्यांसोबतच दिंडीत चालणारे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती माता, लहान मुले आणि इतर आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या घटकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांना प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी आशा स्वयंसेविकांकडून विशेष समुपदेशन केले जात आहे.
‘निरोगी वारी, सुरक्षित वारकऱ्यांची वारी’
आरोग्य विभागाच्या या मोहिमेमुळे यंदाची आषाढी वारी आरोग्यदायी होण्यास मोठी मदत होणार आहे. आशा स्वयंसेविकांच्या प्रभावी आणि सक्रिय सहभागामुळे प्रत्येक वारकऱ्यापर्यंत आरोग्याचा संदेश पोहोचत आहे. ‘निरोगी वारी, सुरक्षित वारकऱ्यांची वारी’ हा संकल्प प्रत्यक्ष भूमीत उतरवण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, या मोहिमेमुळे वारकऱ्यांचा विठू माऊलीच्या चरणी जाण्याचा मार्ग अधिक सुखकर, आनंदी आणि सुरक्षित होणार आहे.
