नागपूर : नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर युवकांमध्ये नाराजी असणे स्वाभाविक असले तरी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ नावाने सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या गटाचे प्रमुख विदेशातून कार्यरत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या गटाला विदेशी निधी मिळतो का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत भाजप आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी व्यक्त केले.

सोशल मीडियावरील गटाबाबत संशय

नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डॉ. आशीष देशमुख यांनी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या सोशल मीडिया आधारित गटावर भाष्य केले. नीट परीक्षेच्या संदर्भात युवकांमध्ये असंतोष आणि नाराजी असू शकते. त्यामुळे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून नागरिक आपली मते व्यक्त करत असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, हा गट कोणत्याही नोंदणीकृत राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचे सांगितले जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच या गटाचे प्रमुख विदेशात वास्तव्यास असून त्याचे सर्व्हरही परदेशात असल्याची माहिती समोर येत असल्याचा दावा त्यांनी केला.

विदेशी निधीचा मुद्दा उपस्थित

या पार्श्वभूमीवर संबंधित गटाला परदेशातून आर्थिक मदत अथवा निधी मिळतो का, हा चौकशीचा विषय असल्याचे डॉ. देशमुख म्हणाले. सोशल मीडिया माध्यमांतून मोठ्या प्रमाणात जनमतावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्यामागील आर्थिक स्रोत पारदर्शक असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. संबंधित यंत्रणांनी या बाबीची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

‘गटार तयार झाले तर घाण निर्माण होणारच’

‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या कार्यपद्धतीवर टीका करताना डॉ. देशमुख यांनी वादग्रस्त भाष्य केले. “गटार तयार होत असेल, घाण तयार होत असेल तर त्यातून कॉक्रोच निर्माण होणारच,” असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

काँग्रेसच्या उमेदवारी माघारीवरही प्रश्नचिन्ह

यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षातील उमेदवारी माघारीच्या घटनांवरही भाष्य केले. भंडारा-गोंदिया या मतदारसंघासह गडचिरोली-चंद्रपूर-वर्धा या मतदारसंघांतील उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला. उमेदवारी मागे घेणाऱ्यांवर कारवाई अथवा हकालपट्टी केली जात असेल, तर ज्यांच्या शिफारशीमुळे त्यांना उमेदवारी देण्यात आली त्या नेत्यांनाही पक्षात का ठेवले जाते, असा सवाल त्यांनी केला. पक्षांतर्गत निर्णयप्रक्रियेत जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.