नागपूर : नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरातच्या लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून विरोधक प्रचंड आक्रमक झाले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारवर हल्ला चढवला असून, खरात याच्यासोबत फोटो असलेल्या मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली आहे.
त्यावर उत्तर देताना रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पलटवार केला. ज्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन खरातच्या संस्थेला ४० किमी अंतरावरून पाणी दिले, त्यांना काय शिक्षा द्यायची असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांकडील अनेकांचे खरातसोबत काढलेले फोटो माझ्याकडे आहे, असा इशारा दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नागपुरात प्रसार माध्यमासोबत बोलत होते. ते म्हणाले, खरात प्रकरण गंभीर आहे. एसआयटीद्वारे सर्वप्रथम या प्रकरणाचा आम्हीच भंडाफोड केला. लाजेखातर महिला पुढे येत नाही. पण त्या महिलांना आम्ही धीर देत असून पुढे आणण्याचा प्रयत्न करीत आहे. काही महिला प्रतिसादही देत आहे. नाशिक पोलीस व एसआयटी योग्य तपास करीत आहे. या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
चाकणकर खरात यांना गुरु मानत होत्या म्हणून राजीनामा
हा महिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, आरोपीला शिक्षा भोगावीच लागेल, असे त्यांनी सांगितले. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर ते म्हणाले, चाकणकर खरात यांना गुरु मानत होत्या. त्यामुळे चौकशीत अडथळा येण्याची शक्यता होती. म्हणून त्यांचा राजीनामा घेतला. ही बाब त्यांनीही मान्य केली अन राजीनामा दिला, असे फडणवीस यांनी सांगितले.
राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये
या प्रकरणात विरोधकांकडून सत्ताधारी तसेच मंत्र्यांवर आरोप केले जात आहे. यावर फडणवीस म्हणाले, या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा कुणी प्रयत्न करू नये. विरोधी पक्षातील कोण कोण खरातला भेटले, तेही माझ्याकडे आहे. कुणी भेटले म्हणून कारवाई केली तर विरोधकही अडचणीत येतील, असा इशारा देत खरातच्या संस्थेला पाणी कुणी दिले हे माध्यमानेच दाखवले आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
खरातसोबत आयएएस अधिकाऱ्यांच्या व्यवहाराचीही चौकशी
खरातसोबत काही दिवसांपूर्वी ३ आयएएस अधिकाऱ्यांनी शिर्डीतील हॉटेलमध्ये बैठक घेतली होती. खरातचे आर्थिक व्यवहार या आयएएस अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांसोबत असल्याची बाब पुढे येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिथे आर्थिक व्यवहार असेल, तिथं चौकशी करण्यात येईल, असे सांगितले.
ममता बॅनर्जी, राहुल गांधींना टोला
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घुसखोर म्हटले, यावर फडणवीस यांनी ममता बॅनर्जी बंगालमध्ये पराभूत होत असल्याने त्यांनी विवेक सोडला, अशी टीका केली. युद्धाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देशात महागाईचे संकेत देत टीका केली होती. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तानमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपल्या देशात चांगली स्थिती आहे. पण राहुल गांधी देशाला बदनाम करीत आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.
