नागपूर : चित्रपटातील खलनायक जितका सामर्थ्यवान, धूर्त आणि क्रूर असतो, तितकाच नायकाचा संघर्ष मोठा वाटतो. त्यामुळे नायकाची बाजू आणि त्याचे गुण प्रेक्षकांना अधिक भावतात व त्याची भूमिका प्रभावी ठरते. अलिकडच्या चित्रपटात हेच समीकरण दिसून येते. विशेषत: सलमान खानच्या चित्रपटातील खलनायक चांगलेच प्रभावी दिसून आले. सलमान खानच्या अशाच एका चित्रपटातील खलनायकाचा नागपुरात नागरी सत्कार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यांना नुकताच पद्मश्रीने गौरविण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी त्यांचा सन्मान करणार आहे.

कोण आहे ‘ते’ खलनायक?

सलमान खानच्या सुरुवातीच्या कारकिर्दीतील चित्रपटांकडे बघितल्यास नवीन नायिका, नवे किंवा एखाद दुसऱ्या चित्रपटात नायक किंवा सहनायक म्हणून चमकलेले चेहरे खलनायकाची भूमिका रंगविताना दिसून आले. यात हिंदी चित्रपटात अनेक सहायक किंवा चरित्र व विनोदी भूमिका करणाऱ्या एका मराठी अभिनेत्याचाही समावेश आहे. सलमानच्या सुरुवातीच्या काळात या मराठीतील या मातब्बर अभिनेत्याने खलनायकी भूमिका करण्याचा प्रयोग प्रथमच केला. १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जागृती’ या चित्रपटात खलनायक साकारणारे दुसरे तिसरे कुणी नसून मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आहे.

सलमानने एका प्रसंगात शुटिंगदरम्यान चिरला गळा

‘जागृती’ चित्रपटात सलमान नायक तर अशोक सराफ मुख्य खलनायक होते. या चित्रपटातील एका प्रसंगाचे शुटिंग करताना सलमान खानने खरा चाकू अशोक सराफ यांच्या गळ्याला लावला होता. त्यावेळी गळा चिरला गेला होता, असे एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी नमुद केले होते. मी सलमानच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न करीत असताना त्याने चाकू जोरात दाबला. तो प्रसंग पूर्ण केल्यानंतर माझा गळा चिरला आणि रक्त बाहेर आले होते, असे अशोक सराफ यांनी सांगितले होते.

म्हणून नागपुरात गौरव सोहळा

मराठी रसिकांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजविणारे, आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रत्येक रसिक मनात स्थान निर्माण करणारे पद्मश्री व महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्या ८० व्या वर्षात पदार्पणानिमित्त श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट, महानगरपालिका आणि वनराईच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता नागपुरातील सिव्हिल लाईन येथील डॉ. देशपांडे सभागृहात हा सत्कार सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे उपस्थित राहणार असून अभिनेते पुष्कर श्रोत्री त्यांची दिलखुलास मुलाखत घेणार आहे.