चंद्रपूर : आदिवासी विकास विभागाच्या वतीने राज्यात चालविल्या जाणाऱ्या १ हजार ५६ आश्रमशाळांमध्ये गेल्या दोन वर्षांत ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या मृत्यूंना जबाबदार कोण, असा थेट सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांना केला. त्यावर ‘आश्रमशाळा तुमच्याही आहेत’, असे प्रत्युत्तर डॉ. उईके यांनी दिले.

गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर राज्यातील आश्रमशाळांमधील गैरव्यवस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. त्यातच ‘लोकसत्ता’ने राज्यातील आश्रमशाळांमध्ये गेल्या दोन वर्षांत ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आणली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात वडेट्टीवार यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके यांच्यावर निशाणा साधला.

‘आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूची जबाबदारी कोणावर निश्चित करणार? संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार?’ असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. सरकारकडून प्रत्येक विद्यार्थ्यामागे दोन हजार रुपये दिले जातात. त्याऐवजी पाच हजार रुपये द्यावेत.

आश्रमशाळा संचालकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. ‘आश्रमशाळांच्या तपासणीदरम्यान काही अधिकारी पैसे घेऊन सर्व काही ठीक असल्याचे दाखवतात. त्यामुळे आदिवासी विकास मंत्र्यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. लेचेपेचे करून काम होणार नाही,’ अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. आश्रमशाळा कुणाच्या आहेत, यापेक्षा गेल्या दोन वर्षांत मृत्यू झालेल्या ५८४ विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण, तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, याचे उत्तर आदिवासी विकास मंत्र्यांनी द्यायला हवे, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.