नागपूर : शहरातील वादग्रस्त तरुणी अश्विनी उर्फ आशी डे हिचा मृतदेह सोमवारी पहाटे कान्हान नदीच्या पुलाखाली पाण्यात आढळून आल्याने खळबळ उडाली. त्यानंतर ही आत्महत्या नसून तरुणीचा खून झाल्याचा निष्कर्षापर्यंत पोलिसांचा तपास पोहचला आहे. पोलिसांनी या प्रकरणात मारेकऱ्याला ताब्यात घेतले आहे. जुन्या प्रेमप्रकरणानंतर झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या खून प्रकरणात आशिष उर्फ मोनू किशोर मनपिया या आरोपीला कन्हान पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ताब्यात घेतले आहे.
आशी डे हीचा रात्री ३ वाजता कन्हान नदीवरील पुलावरून खाली ढकलून खून झाल्याचे स्पष्ट झाले. धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी आरोपीने तिला खाली लोटून दिले त्यावेळी रेल्वेच्या ट्रॅकमनला काहीतरी खाली कोसळल्याचा आवाज आला होता. त्यानंतर त्याने टाॅर्चचा लाईट टाकून पाहिेले असता तरुणी खाली पडल्याचे दिसले.
काय घडली होती घटना…?
सोमवारी पहाटे सुमारे तीनच्या सुमारास कान्हान पोलिसांना नदीत महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. सुरुवातीला ओळख पटणे कठीण गेले, मात्र उपलब्ध छायाचित्रे आणि इतर माहितीच्या आधारे मृतदेह आशी डे हिचाच असल्याची माहिती समोर आली.
जुन्या वादातून झाली हत्या….
तपासादरम्यान पोलिसांनी आशी डे हिचे जुने वाद, वैयक्तिक संबंध, आर्थिक व्यवहार तसेच अलीकडील हालचालींची माहिती गोळा केली. डे या तरुणीने राणा प्रताप नगर आणि यशोधरा नगर पोलीस ठाण्यात आशिष उर्फ मोनू किशोर मनपिया विरोधात दोन तक्रारी केल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्याच वादातून आरोपी आशिषने तीला तोडगा काढण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून कन्हान कडे नेले होते. त्यानंतर त्याने आशी हिला मध्यरात्री पुलावरून खाली ढकलून दिले होते.
रेल्वेच्या ट्रॅकमॅनने पाहिली घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशी डे हीचा कन्हान नदीच्या रेल्वे पुलावरून ढकलून देत खून करण्यात आला. मध्यरात्री तीनच्या सुमारास रेल्वेच्या रुळाची पाहणी करणाऱ्या ट्रॅकमॅनने एकाला कोणीतही ढकलून देत असल्याचे दिसले. त्यानंतर कोणीतही खाली कोसळल्याचा आवाज आल्याने ट्रॅकमॅनने रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या प्रकाशात खाली पाहिले असता त्याला मृतदेह दिसला. ट्रॅकमॅन हा घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षिदार असल्याने पोलीस तपासाला दिशा मिळाली होती.
