Black scorpion mother and babies : वर्धा : जंगलात फिरतांना काही नवे नित्य बघायला मिळते. निसर्ग काही शिकवून जातो, असे वन्य अभ्यासक सांगतात. जंगल समजून घेण्यासाठी डोळ्यात निरीक्षण, मनात संवेदनशीलता व सत्य शोधण्याची जिद्द असावी लागते. जंगलातील दगडं, माती, झाडांची साल, पक्ष्यांचा कलरव, प्राण्यांच्या सावध हालचाली, लहान बिळे व अन्य. असाच जंगल अभ्यास नेहमी करणारे निसर्गप्रेमी शिवसांब घोडके यांना एक सत्य गवसले.
प्राण्यांबद्दल विविध प्रवाह आहेत. जसे वटवाघळे अंध असतात. ते मानवी रक्त पितात. उंट त्याच्या वशिंडात ( Hump ) पाणी साठवून ठेवतो. साप दूध पितो व अन्य असे ऐकायला मिळते. पण ते असत्य. तसेच आता या प्राणी किंवा किड्याचे.
काळा विंचू
जंगल भ्रमंती करीत असतांना घोडके यांना दगडाच्या ढिगाऱ्याजवळ एक बीळ दिसले. बिळाच्या तोंडावर एक मोठ्या आकाराचा मृत विंचू पडून होता. सामान्य विंचवापेक्षा हा वेगळा होता. लांबी – रुंदी अधिक, मजबूत नांग्या, मोठे जाड पाय. घोडके यांनी अनेक विंचू पाहले, त्यापेक्षा हा वेगळाच. सोबत असणाऱ्या वन मजुरांना त्यांनी विचारले की हा जिवंत की मेलेला. तेव्हा एका वयस्क मजूर सांगू लागला की या विंचवाची पिल्ले जन्मताच त्यांच्या आईला खाऊन टाकतात. त्यामुळे हा विंचू मेलेलाच. असे खात्रीपूर्वक तो बोलला. अधिक माहिती घेतली आणि समजले की यास इंगळी किंवा काळा विंचू असे महाराष्ट्रात म्हटल्या जाते. Asian Forest Scorpion असे त्याची ओळख.
हा विंचू ईथे आढळतो
मजुरांची माहिती पटली नाही म्हणून घोडके यांनी अधिक शोध सूरू केला. संशोधन पेपर अभ्यासले, वैज्ञानिक माहिती तपासली, वन्यजीव अभ्यासकांचे अनुभव वाचले आणि सत्य पुढे आले. हा विंचू (Heterometrus) आशियातील सर्वात मोठया विंचवांपैकी एक आहे. भारतासोबतच तो श्रीलंका, थायलंड, मलेशिया या उष्ण कटीबंधीय देशातील जंगलात आढळतो. सावलीत राहणे पसंत करतो. सडलेल्या लाकडाखाली, पाला पाचोळ्यात, स्वतः खोदलेल्या बिळात तो राहतो. निशाचर असून दिवसभर बिळात असतो. रात्री शिकार करतो. डोळे तीक्ष्ण व जमिनीतील कंपन तडक ओळखतो. पूर्णतः मांसाहारी व झुरळ, उंदीर, लहान सरडे, अळ्या हे खाद्य.
शिकार पद्धत अशी आहे
हा विंचू आपल्या मजबूत नांग्यांनी शिकार पकडतो. विशेष म्हणजे विषापेक्षा तो आपल्या ताकदवान चिमट्याचा अधिक वापर शिकारित करतो. या विंचावाच्या शरीरावर प्रकाश पडल्यास निळसर हिरवी चमक शरीरावर दिसून येते. मात्र त्यांच्याबद्दल एक मोठा गैरसमज लोकांत पसरला आहे. पिल्ले आईला खातात, असा.
नेमके वास्तव काय आहे
पण वैज्ञानिक वास्तव असे की हा विंचू अंडी घालत नाही. थेट पिल्लांना जन्म देतो. मादी १० ते ३० पिल्लांना जन्म देते. पिल्ले पांढऱ्या रंगाची असतात. जन्मानंतर आई पिल्लांना पाठीवर चढवून सुरक्षित करते. काही दिवस पिल्ले पाठीवरच राहतात. जोवर पिल्लांचे बाह्यकवच कठीण होत नाही आणि जगण्यास सक्षम होत नाही तोवर आईच त्यांची काळजी घेते. हे खरे सत्य. घोडके सांगतात की हा विषारी जीव देखील मातृत्वाची सुंदर भावना जपतो. अनेकवेळा आपण ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवतो. पण सत्य वेगळेच असते. प्रत्येक जीवाचा आदर केला पाहिजे. त्या दिवशी दगडाजवळ पडलेली इंगळी किंवा काळा विंचू एक धडा शिकवून गेला. प्रत्येक जीवात मातृत्व, संरक्षण व जगण्याची उपजत भावना असते.
