नागपूर : महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाची सोमवारपासून सुरुवात झाली आणि या प्रारंभावेळी सभागृहात राष्ट्रभावना बघावयास मिळाली. अधिवेशनाची सुरुवात नेहमीप्रमाणे ‘वंदे मारतम’ आणि ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने झाली, मात्र यंदा या सोहळ्याला विशेषत्व आले ते ‘वंदे मातरम्’च्या मूळ स्वरुपातील संपूर्ण गायनामुळे.
विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले की बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचित ‘वंदे मातरम्’ या कालजयी गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने सभागृहात त्याचे मूळ स्वरूपातील संपूर्ण गायन करण्यात येणार आहे. त्यांच्या या घोषणेनंतर संपूर्ण सभागृह उभे राहिले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रीमंडळातील सदस्य तसेच सर्व पक्षांचे आमदार यांनी एकसुरात ‘वंदे मातरम्’चे भावपूर्ण गायन केले. राष्ट्राभिमानाचा हा क्षण संपूर्ण सभागृहाने उत्साहात अनुभवला.
‘वंदे मातरम्’चा इतिहास भारतीय स्वातंत्र्यचळवळीशी घट्ट जोडलेला आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंद मठ या कादंबरीत या गीताचा पहिला उल्लेख आढळतो. १८७२ ते १८७५ दरम्यान या गीताची प्रारंभीची दोन कडवी लिहिली गेली, तर १८८१ मध्ये ते आनंद मठचा भाग म्हणून प्रथम प्रकाशित झाले. राष्ट्रवादी चळवळींचे हे गीत पुढे स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक बनले आणि क्रांतिकारी अरविंद घोष यांनी बंकिमचंद्रांना ‘राष्ट्रवादाचे ऋषि’ ही उपाधी दिली.
या गीताचे सार्वजनिक मंचावर सर्वप्रथम गायन रवींद्रनाथ टागोर यांनी केले होते. १८९६ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात टागोर यांनी ‘वंदे मातरम्’चा पहिला अंतरा गायला आणि ते आपल्या आयुष्यातील सौभाग्य असल्याचे त्यांनी नंतर नेहरूंना लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते. आनंद मठ ही कादंबरीही राष्ट्रीयतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ब्रिटिशांच्या अत्याचारांविरोधात संपूर्ण समाज एकजूट होऊन उभा राहतो, असे सामर्थ्यवान चित्र या कादंबरीत रंगवले आहे. समाजातील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीचे वास्तव वर्णन करताना देशभक्तीची जाणीव जागवणे हा बंकिमचंद्रांचा मुख्य उद्देश होता.
