अकोला : नववर्षात अवकाश नवलाई राहणार असून खगोलप्रेमींसाठी वर्षभर अनोख्या व आकर्षक घडामोडींची पर्वणी लाभणार आहे, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी दिली.

सध्या संध्याकाळच्या सुमारास पूर्व क्षितिजावर सूर्यमालेतील सर्वात मोठा गुरू ग्रह रात्रभर दर्शन देत आहे. पूर्वेच्या अपूर्व नजाऱ्यात बहू परिचित मृग नक्षत्र, डाव्या बाजूस मिथुन राशी व अधिक प्रकाशित दिसणारा गुरु ग्रह, थोडं वर वृषभ राशीतील रोहिणी आणि डोक्यावर मेष राशीतील अश्विनी पाहता येईल. वर्षारंभीच ३ जानेवारीला चंद्र आणि सूर्य पृथ्वीच्या जवळ आल्याने चंद्र अधिक प्रकाशित असल्याने सुपर मून असेल. असाच नजारा २४ नोव्हेंबर व २४ डिसेंबर रोजी बघता येईल. सूर्य सुध्दा येत्या ३ जानेवारीला पृथ्वी जवळ येईल. सध्या सूर्य दक्षिण गोलार्धात झुकलेला असल्याने तिकडे कडक उन्हाळा, तर उत्तर गोलार्धात हिवाळा आहे, असे दोड यांनी सांगितले.

यावर्षी आकाशात अनेक घटनांची रेलचेल असून त्यात ग्रहणे, उल्का वर्षाव, ग्रहांची युती-प्रतियुती, आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन स्थानक, स्टार लिंक्स, ग्रह दर्शन, सुपर मून, अचानक दाखल होणारे धुमकेतू अशा अनेक आकर्षक घडामोडी बघता येणार आहेत. नववर्षात सूर्य, चंद्र व प्रत्येकी दोन अशी चार ग्रहणे असून आपल्याला एकच ३ मार्चचे चंद्रग्रहण दिसेल.

उल्का वर्षाव आणि महत्त्वपूर्ण दिवस

पृथ्वी कक्षा आणि धुमकेतू किंवा लघुग्रह यांच्यातील वस्तूकण पृथ्वी गुरुत्वाकर्षणामुळे खेचल्या गेल्याने उल्का वर्षाव अनुभवता येतो. वर्षारंभी ३ व ४ जानेवारी,२३ एप्रिल, ५ मे, २८ जुलै १३ ऑगस्ट, २१ऑक्टोबर, ६ व १२ नोव्हेंबर आणि १४ व २३ डिसेंबर या दिवशी तारे तूटतांना दिसतील. २० मार्च व २३ सप्टेंबर या विषुवदिनी वसंत व शरद संपात व २१ जून आणि २२ डिसेंबर अयनदिन असतील. अधिक ज्येष्ठमास १७ मे ते १५ जून पर्यंत असेल. सध्या पूर्व आकाशातील गुरु ग्रह १ जून रोजी कर्क राशीत व नंतर १७ जूलैला अस्त आणि मग १० ऑगस्टला पूर्वोदयानंतर ३१ ऑक्टोबरला सिंह राशीत प्रवेश करेल. सर्वात तेजस्वी शुक्र ग्रहाचा अस्त असून १ फेब्रुवारीला पश्चिमेस १९ ऑक्टोबरपर्यंत व नंतर दिवाळी आधी दर्शनार्थ सज्ज होईल. सूर्याच्या जवळ असलेला बुध ग्रह कधी सूर्योदयापूर्वी पूर्वेस किंवा सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात पाहता येईल. लालसर रंगांचा मंगळ ग्रह या वर्षात अधिक वेळ सूर्य सान्निध्यात राहिल्याने कमी दर्शन देईल, असे प्रभाकर दोड म्हणाले.