नागपूर : ममत्त्वाची सुखद अनुभूती फक्त माणसेच अनुभवतात असे नाही, किंबहुना अधिक जास्त ती प्राण्यांमध्ये दिसून येते. वाघांबाबत बोलायचे तर दोन वर्षांपर्यंत हे बछडे वाघिणीसोबतच राहतात. या कालावधीत ती त्यांना खाऊ घालण्यापासून तर शिकार करण्याचे प्रशिक्षण देते. यादरम्यान मातृत्त्वाचा सोहोळा त्यांच्यातही रंगलेला दिसून येतो. असाच एक अविस्मरणीय प्रसंग उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांनी अनुभवला. ‘एफ २’ ही वाघीण तिच्या तीन महिन्यांच्या दोन बछड्यांसह त्यांच्या नैसर्गिक अधिवासाची भ्रमंती करताना दिसून आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य काही वर्षांपूर्वी ‘जय’ असे नामकरण झालेल्या वाघाने प्रसिद्धीस आणले होते. तो गेला आणि काही काळ या अभयारण्याची रया गेली. दरम्यानच्या काळात ‘चांदी’, ‘फेअरी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघिणींनी पुन्हा एकदा या अभयारण्याला वलय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अभयारण्य परिसरातील गोठणगाव प्रवेशद्वार क्षेत्र हाच अधिवास असणाऱ्या ‘फेअरी’ आणि तिच्या पाच बछड्यांनी पुन्हा पर्यटकांना ओढ लावली. ते मोठे झाले आणि त्यांनी आपला नवा अधिवास शोधला. त्यानंतर हे अभयारण्य पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या वलयातून बाहेर पडले.

हेही वाचा – मंगळ आणि बुध ग्रह जवळ येणार, पूर्व क्षितीजावर अपूर्व अनुभूती; वाचा अनोख्या दृष्याचा आनंद केव्हा घेता येणार?

अलीकडच्या वर्षभरात पर्यटकांचा मोर्चा या अभयारण्याकडे वळला आहे, कारण येथे सहजपणे होणारे व्याघ्रदर्शन. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला तर ‘एफ २’ या वाघिणीने तिच्या तीन महिन्यांच्या बछड्यांसह अभयारण्यात सहजपणे भ्रमंती सुरू केली आहे. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात सफारीसाठी पर्यटकांची पहिली पसंती गोठणगाव प्रवेशद्वार आहे, कारण ‘एफ २’ वाघीण आणि तिचे बछडे. त्यामुळे ‘फेअरी’ व तिच्या पाच बछड्यांनी प्रसिद्ध केलेल्या या प्रवेशद्वाराचा वारसा आता ‘एफ २’ ही वाघीण आणि तिचे दोन बछडे पुढे चालवत आहेत. या बछड्यांच्या जन्मानंतरही ती बरेचदा बछड्यांना तोंडात घेऊन इकडून तिकडे जाताना दिसायची, पण ते क्वचितच. आता मात्र ती सहजपणे पर्यटकांना दर्शन देत आहे.

हेही वाचा – मराठा सर्वेक्षण ठरतंय अडथळ्याची शर्यत! आठवड्यात साडेसहा लाख घरांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान; आयोगाच्या सदस्या बुलढाण्यात मुक्कामी

२३ जानेवारीला सायंकाळी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव सफारी प्रवेशद्वारावर ‘एफ २’ ही वाघीण तिच्या तीन महिन्यांच्या चिमुकल्या बछड्यांना सोबत घेऊन भ्रमंतीला निघाली. जणू ती आपल्या बछड्यांना त्यांच्या अधिवासाची ओळख करुन देत होती. हा मनमोहक अनुभव तातडीने ‘डेक्कनड्रीफ्ट्स’चे वन्यजीव अभ्यासक पीयूष आकरे व नितीन बारापात्रे यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात टिपला. ‘एफ २’ या साडेतीन वर्षांच्या वाघिणीने पहिल्यांदाच बछड्यांना जन्म दिला आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या बछड्यांना खुल्या जंगलात पर्यटकांसमोर काढण्याचे धाडस यापूर्वी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या ‘माया’ या वाघिणीने केले होते. त्यानंतर उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगावची राजमाता म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या ‘एफ २’ या वाघिणीने हे धाडस केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At the umred karhandla sanctuary tourists saw tigresses and cubs rgc 76 ssb
First published on: 24-01-2024 at 16:18 IST