वर्धा: भारतातील सर्वोत्तम व जगातील पाचपैकी एक असा रुबाब मिरविणारी वायगावी हळद ही रंग व चवीत उत्कृष्ट मानली जाते. तिचा दर्जा वधारला तो या हळदीत असणाऱ्या कुरकुमीन या औषधी तत्वामुळे. कर्करोग प्रतिबंधक व रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे हे रसायन वायगावी हळदीचे महात्म्य वाढवते. हे तत्व इतर हळदीत ३ ते ५ टक्के तर या हळदीत ६ ते ७ टक्के प्रमाणात असते. समुद्रपूर तालुक्यात वायगाव या गावात प्रामुख्याने उत्पादन होते. मोगल काळात नागपूर प्रांत सुभेदाराने वायगावला उपलब्ध करून दिलेल्या जमिनीच्या ३०० पट्ट्यात शेतकऱ्यांनी ही हळद लावायला सुरवात केल्याचा इतिहास आहे.आता हीच हळद दुबई स्वारी करणार. शेतकरी उत्पादक कंपनी समुद्रपूर, विदर्भ नैसर्गिक शेतमाल किसान उत्पादक कंपनी खैरगांव व वायगाव हळद शेतकरी उत्पादक कंपनी गिरड या शेतकरी सदस्य असलेल्या कंपन्यांनी निर्यात करार केला आहे. एकट्या समुद्रपूर तालुक्यात वार्षिक ५६१ मेट्रिक टन उत्पादन होते.
वायगाव हळद शेतकरी उत्पादक कंपनीने २०१६ मध्ये भौगोलिक मानांकन प्राप्त केले. विदेशात या हळदीस मागणी राहली. परंतू प्रथमच मोठ्या प्रमाणात निर्यात होण्याची ही पहिली वेळ. ९ मे रोजी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या हस्ते पहिल्या कंटेनरला हिरवी झेंडी दाखवण्यात येणार. आत्मा व युनिव्हर्सल एक्स्पोर्टरतर्फे हा निर्यात व्यवहार होत आहे. दीड मेट्रिक टन दुबईत जाणार.
करोना काळात या वायगावी हळदीची चांगलीच चर्चा झाली. औषध नाही म्हणून प्राण कंठाशी येण्याच्या त्या काळात वायगावी हळदीची कॅप्सूल एक प्रभावी उपाय ठरला. सेवाग्राम रुग्णालयाने तर करोनाग्रस्त प्रत्येक रुग्णास ही कॅप्सूल दिली होती. या हळदीत तेलाचे प्रमाण पण अधिकच. आजीबाईच्या बटव्यात मानाचे स्थान हळदीस असते. पण वायगाव हळदीने आधुनिक वैद्यक शास्त्रात स्थान अधोरेखित केले आहे. निर्यात व्यवहार हळद उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक बळ वाढविणार. सुरवातीस नागपूर व अन्य ठिकाणचे व्यापारी पडेल किंमतीत ही हळद खरेदी करीत बक्कळ नफा कमवायचे. मात्र कंपनी स्थापन करीत स्वतः विक्रीत उतरणाऱ्या शेतकऱ्यांनी मग मागे वळून पाहलेच नाही. हळदीचा सन्मान म्हणून भारतीय डाक विभागाने हळदीचे विशेष कव्हर २०२४ साली प्रसिद्ध केले.
वायगाव शेतकरी हळद उत्पादक कंपनीचे अध्यक्ष पंकज भगत म्हणतात, ही निर्यात फायदेशीर ठरणार. ओली हळद येथे ५० रुपये किलोने विकल्या जाते. मात्र एक्स्पोर्टर आम्हास १५० रुपये भाव देणार आहे. ही हळद पूर्वी पण विदेशात गेली आहे. पण तो व्यवहार व्यापारी वर्ग करीत असल्याने कोणत्या देशात हळद गेली हे कळत नव्हते. आता थेट आमच्याशी करार झाला. एकदा ओमान सोबत करार झाला होता. पण त्या कंपनीला करोना लाटेत व्यवहार करणे शक्य झाले नव्हते.