नागपूर : पोलिसांच्या संरक्षणात भाजपच्या नेत्यांवर हल्ले करणे, आमच्या नेत्यांवर अंडी, टमाटर फेकण्याचा प्रयत्न करणे,हे गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे  असल्यानेच होत आहे. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. त्यामुळे पहिल्यांदा तक्रार करू, मात्र कारवाई झाली नाही, तर आम्हीही सोडणार नाही, असा इशारा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

  फडणवीस मंगळवारी रात्री नागपुरात आले असता ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले,  यापूर्वी नवनीत राणा सोबत जे काही झाले तेव्हा सुप्रिया सुळे काहीच बोलल्या नाही. यापूर्वीही महिलांवर जेव्हा जेव्हा हल्ले झाले, तेव्हा त्या काहीच बोलल्या नाही. आमच्या पक्षातील काही महिला नेत्यांना जेव्हा पोलिसांनी वाईट वागणूक दिली तेव्हाही त्या काही बोलल्या नाही. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी  महिलांच्या संदर्भात अशी भूमिका वारंवार घेतली तर आम्ही त्यांचे स्वागत करू.

शिवसेना एक स्वतंत्र पक्ष आहे. त्यांना काय करायचे आहे ते ठरवतील. छत्रपती संभाजी राजे स्वत: सक्षम आहेत, त्यांचा निर्णय ते स्वत: घेतील. त्यामुळे या संदर्भात मी काही बोलणार नाही. प्रभाग रचना आराखडा जाहीर करण्यात आला असला तरी आता सर्व काही निवडणूक आयोगावर अवलंबून आहे. साधारणपणे सात जूनला आपल्याकडे मोसमी पाऊस दाखल होतो. जर निवडणूक आयोगाचे काम तोपर्यंत संपू शकले, तर ते निवडणूक घेतील. अन्यथा घेऊ शकणार नाहीत. मात्र जोवर निवडणूक आयोगाचा अधिकृत निर्णय समोर येत नाही, तोवर त्याबद्दल अंदाज व्यक्त करणे योग्य नाही, असेही फडणवीस म्हणाले.